पावसाचा जोर कायम; पंचगंगा पात्राबाहेर, कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी 30 फुटांवर; 35हून अधिक बंधारे पाण्याखाली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्ह्यात आज पाचव्या दिवशीही पावसाचा जोर कायम राहिला. यंदा प्रथमच पंचगंगा नदी आज दुपारी पात्राबाहेर पडली. गेल्या 24 तासांत नदीच्या पातळीत तब्बल सहा फुटांची वाढ झाली. सायंकाळी चारच्या सुमारास पंचगंगा नदी 30 फुटांवर वाहत होती. जिल्ह्यातील 299 बंधाऱ्यांपैकी 35 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

सद्यस्थितीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे सुरळीत आहे. कोणतीही रेल्वे सेवा विस्कळीत झालेली नाही. राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस कोणताही अडथळा नाही. जोरदार पावसामुळे दोन राज्यमार्ग, दोन प्रमुख जिल्हा मार्ग, दोन ग्रामीण मार्ग आणि एक इतर जिल्हा मार्ग असे एकूण सात रस्ते वाहतुकीसाठी बाधित झाले आहेत. संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे.

सायंकाळी चारच्या सुमारास पंचगंगा नदीची राजाराम बंधारा येथे पाणीपातळी 30 फूट झाली होती. इचलकरंजी 54 फूट, शिरोळ बंधारा येथे 37 फूट 6 इंच आणि नृसिंहवाडी येथे 33 फूट 6 इंच होती. तीनही ठिकाणी नदीची पाणीपातळी इशारा पातळीपेक्षा खाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात सध्या कोणताही तातडीचा पूरधोका निर्माण झालेला नाही.

राधानगरी धरणात 41.29 टक्के पाणीसाठा असून, धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद आहेत. तुळशी धरणात 43.69 टक्के, वारणा धरणात 40.18 टक्के आणि दूधगंगा धरणात 15.51 टक्के पाणीसाठा आहे. वारणा व दूधगंगा धरणातून प्रत्येकी 100 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर कालच ओव्हरफ्लो झालेल्या चंदगड तालुक्यातील घटप्रभा धरणातून 6 हजार 34 क्युसेक विसर्ग सुरू आहे. जिह्यात आजअखेर कोणत्याही कुटुंबाचे स्थलांतर करण्याची आवश्यकता भासलेली नाही. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महसूल, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणा सतर्क असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत.

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143 मि.मी.पाऊस

 कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत एकूण सरासरी 52.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 143.1 मि.मी., आजरा 67.6, चंदगड 65.3, कागल 60.2, भुदरगड 85.9, पन्हाळा 58.3, शाहूवाडी 46.9, गडहिंग्लज 43.4, करवीर 40.1, राधानगरी 81,हातकणंगले-20.9 आणि शिरोळ तालुक्यात 16.8 मि.मी. पावसाची नोंद झाली.