
फुटबॉल विश्वातील सर्वात मोठा उलटफेर रविवारी न्यू यॉर्क न्यू जर्सी स्टेडियमवर पाहायला मिळाला. स्टार स्ट्रायकर एार्लिंग हालांडने केलेल्या दोन अद्भूत गोल्सच्या जोरावर नॉर्वेने बलाढ्य ब्राझीलचा 2-1असा पराभव करत फिफा विश्वचषक 2026 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या पराभवासोबतच 5 वेळच्या विश्वविजेत्या ब्राझीलचे आव्हान बाद फेरीच्या पहिल्याच टप्प्यात संपुष्टात आले. 1990 नंतर ब्राझीलची ही विश्वचषकातील सर्वात सुमार कामगिरी ठरली आहे.
सामन्याच्या सुरुवातीला ब्राझीलने आक्रमक सुरुवात केली. मॅथ्यूज कुन्हा याला डी-बॉक्समध्ये पाडल्यामुळे व्हीएआरच्या मदतीने ब्राझीलला पेनल्टी बहाल करण्यात आली. मात्र, नॉर्वेचा गोलकीपर ओर्जन नायलंड वेगळ्याच मूडमध्ये होता. ब्रुनो गुइमारेसने घेतलेली पेनल्टी नायलंडने डावीकडे सूर मारत अप्रतिमरित्या रोखली. यानंतरही त्याने विनिशिअस जुनियर आणि गॅब्रिएल मार्टिनेलीचे गोलचे निश्चित प्रयत्न हाणून पाडत नॉर्वेची तटबंदी मजबूत ठेवली.
पहिल्या हाफमध्ये शांत राहिलेल्या एार्लिंग हालांडने उत्तरार्धात आपला खरा रुद्रावतार दाखवला. सामन्याच्या 79 व्या मिनिटाला अँड्रियास श्शेलडेरुपच्या अचूक क्रॉसवर एार्लिंग हालांडने ब्राझीलच्या बचावपटूंना चकवून एक उत्कृष्ट हेडर मारला आणि नॉर्वेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 90 व्या मिनिटाला एार्लिंग हालांडने बॉक्सच्या कडेवरून एक अप्रतिम लोअर शॉट मारत थेट फुटबॉल जाळ्यात धाडला आणि स्कोअर 2-0 केला. या दोन गोल्ससह एार्लिंग हालांडने चालू स्पर्धेत लिओनेल मेस्सीच्या 7 गोल्सच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
सामन्याच्या 67 व्या मिनिटाला मैदानावर आलेल्या नेयमारने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह भरला. इंज्युरी टाईममध्ये मिळालेल्या पेनल्टीवर गोल करत नेयमारने ब्राझीलचे खाते उघडले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हा गोल ब्राझीलचा पराभव टाळू शकला नाही. 24 वर्षांचा विश्वचषक दुष्काळ संपवण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या ब्राझीलला सलग सहाव्यांदा युरोपियन संघाकडून पराभूत होऊन बाहेर पडावे लागले आहे. तर दुसरीकडे नॉर्वेचा संघ उपांत्यपूर्व फेरीमध्ये इंग्लंडशी भीडणार आहे. इंग्लंडने मेक्सिकोचा 3-2 असा थरारक पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे.






























































