सोसाट्याच्या वाऱ्याने झाडे मुळासकट कोसळली, दादर परिसरात सर्वाधिक फटका; मुंबईत 142 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या तक्रारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि उपनगराला रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. मागील 24 तासांत सुमारे 150 ते 170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 72 ते 75 किलोमीटर राहिला. यामुळे शहर आणि उपनगरांत तब्बल 142 ठिकाणी झाडे आणि फांद्या पडल्याच्या घटना घडल्या. दादर परिसरात 23 झाडे मुळासकट कोसळली. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले.

रस्ते, फुटपाथ किंवा इतर विकासकामे करताना झाडांच्या मुळांना हानी झालेली आहे. झाडांभोवती मुळांना नुकसान करून सिमेंटचे कोबा टाकलेले आहेत. त्यामुळे झाडांची मुळे कमकुवत झाली असून झाडे धोकादायक झाली आहेत. त्याचा दुष्परिणाम आज दिसून आला. मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळली. बृहन्मुंबई क्षेत्रात झाडे किंवा फांद्या पडण्याच्या महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे 276 तक्रारी आल्या होत्या.

ताशी 77 किमी वेगाने वारे

शहरात सी आणि डी विभाग शहरात ताशी 72.4 किमी इतक्या वेगवान वाऱयाची नोंद झाली. तसेच पूर्व उपनगरात घाटकोपर येथे ताशी 75 किमी वेगाच्या वाऱयाची नोंद झाली असून पश्चिम उपनगरात सर्वाधिक वांद्रे पश्चिम येथे ताशी 77 किमी किमी वेगाने वारे वाहिल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तक्रारींचा पाऊस

 रविवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शहर भागात-33 मिमी, पूर्व उपनगरात-50 मिमी तर पश्चिम उपनगरात 48 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे, तर शहर व उपनगरात नागरिकांकडून विविध प्रकारच्या घटनांबाबत तब्बल 276 तक्रारींची नोंद करण्यात आली आहे.

 हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’चा इशारा दिला होता. त्यामुळे महापालिकेने तब्बल दहा हजार अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांची पथके ठिकठिकाणी तैनात केली होती.

 वरळी डेअरीजवळ खान अब्दुल गफार खान मार्गावर तीन मजली रिकामे बांधकाम पडले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. 12 ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्यामुळे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला.