नाशिकमध्ये उद्या ढगफुटीचा मोठा धोका; 300 मिमी पावसाचा इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्यासाठी गंभीर इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले की, सध्या राज्यातील सर्वात महत्त्वाचा हवामानाचा इशारा नाशिकसाठी असून तेथे मोठा कमी दाबाचा पट्टा (Low Pressure Belt) तयार होत आहे. त्याचे रूपांतर तीव्र दाबक्षेत्रात (Major Depression) होत असून त्यामुळे नाशिक आणि त्र्यंबकेश्वरदरम्यानच्या भागात उद्या ढगफुटी होण्याची दाट शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही ढगफुटी अत्यंत तीव्र स्वरूपाची असू शकते. या भागात सुमारे 300 मिमीपर्यंत पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना या मुसळधार पावसाचा फटका बसू शकतो.

या संभाव्य आपत्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी केली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातही आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

ढगफुटीसारख्या परिस्थितीत उद्भवू शकणाऱ्या संभाव्य संकटाचा अंदाज घेऊन प्रशासनाने विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. मात्र हा संभाव्य मोठा हवामानविषयक धोका असल्याने परिस्थितीवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.