
सध्या संपूर्ण राज्याला पावसाने झोडपले आहे. अनेक ठिकाणी पाणी भरले आहे काही ठिकाणी झाडे कोसळून दुर्घटना घडली आहे. मुंबई-पुणे दळणवळण पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. मिसिंग लिंक प्रकल्प, दरडी कोसळण्याच्या घटना, मानखुर्द दुर्घटना आणि पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या घटनांची दखल घेत,आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्या. तसेच जनतेनेही सतर्क राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच सत्ताधाऱ्यांना जनतेच्या सुरक्षेची काळजी आहे का? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
राज्यात या पूर्वीही पाऊस झाला आहे. मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून हे अतिशय चिंताजनक आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मिसिंग लिंकसह अनेक महत्त्वाचे मार्ग बंद झाले आहेत. आळंदीमध्ये पूरस्थिती आहे, रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे, अनेक ठिकाणी दरडी कोसळत आहेत आणि रस्ते खचल्याच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत राज्य सरकारने संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन महाराष्ट्रातील वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी.
याबाबत एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-पुण्यासह अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरांमध्ये अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूकीची कोंडी होत असून यामुळे नागरीकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. माझी शासनाला विनंती आहे की, पुण्यातील राजीव गांधी इन्फोटेक पार्कसह पावसाचा तडाखा बसलेल्या ठिकाणी ज्या आस्थापनांमध्ये शक्य आहे तेथे ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याच्या मुभा कर्मचाऱ्यांना द्यावी.
माझे नागरीकांना आवाहन आहे की कृपया आपण काळजी घ्यावी. विशेषतः नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


























































