
पुणे आणि मुंबई या दोन शहरांदरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची पहिल्याच मुसळधार पावसाने परीक्षा घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाला मोठा फटका बसला असून, बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ डोंगरातून मोठी दरड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.
मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या वरच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी थेट बोगद्याच्या मध्यभागी आले. या पाण्याबरोबर मोठमोठे दगड आणि माती वाहून आल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला. एवढेच नव्हे तर बोगद्याच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेली सिमेंट-काँक्रीटची कमान दोन्ही बाजूंनी कोसळली. परिसरातील काही बांधकामही खचल्याचे दिसून आले असून, पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तेथे धबधब्यासारखी परिस्थिती निर्माण झाली.
घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचाव आणि साफसफाईची मोहीम हाती घेतली आहे. पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने दरड, दगड आणि कोसळलेल्या काँक्रीटचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याजवळील एक मोठा काँक्रीटचा स्लॅबही तुटून खाली पडल्याने तो हटविण्याचे काम सुरू असून, संपूर्ण परिसरातील अवजड साहित्य हटविण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे.
या घटनेमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात आली असली, तरी पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील हा मार्ग काही काळ बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी म्हणून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. लोणावळा परिसरात रेल्वे रुळांवर मोठी दरड कोसळल्याने सकाळपासून रेल्वे वाहतूकही विस्कळीत झाली आहे.
मिसिंग लिंक परिसर हा अतिसंवेदनशील डोंगराळ भाग असून पावसाळ्यात येथे अतिवृष्टी होत असते. त्यामुळे अशा भागात उभारण्यात येणाऱ्या पायाभूत प्रकल्पांचे नियोजन आणि बांधकाम अधिक सक्षम असणे अपेक्षित असते. मात्र उद्घाटनानंतरच्या पहिल्याच मोठ्या पावसात संरक्षणासाठी उभारलेली काँक्रीटची कमान आणि इतर बांधकाम कोसळल्याने प्रकल्पाच्या बांधकामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर काम सुरू असले तरी पुढील काही तासांत मिसिंग लिंक मार्ग पूर्णपणे सुरू होण्याची शक्यता कमी असल्याचे चित्र आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे.



























































