
दापोलीत सलग चौथ्या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यातच इळणे येथील केसरी नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील काही गावांचा संपर्क तुटला आहे.
दापोली तालुक्यातील इळणे पंचक्रोशी महत्त्वाची मानली जाते. या पंचक्रोशीतून केसरी नदी वाहते. या नदीवर लोणवडी आणि इळणे गावांना जोडणारा एक महत्त्वाचा पूल आहे. याच पुलामुळे इळणे, वाघिवणे, माळवी आणि लोणवडी ही गावे एकमेकांशी जोडली गेली आहेत. मात्र, सध्या दापोलीला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून त्याला इळणे पंचक्रोशीदेखील अपवाद राहिलेली नाही.
केसरी नदीला पूर आल्याने येथील पूल पाण्याखाली गेला आहे. परिणामी, लोणवडी, इळणे, माळवी आणि वाघिवणे या गावांचा एकमेकांशी असलेला संपर्क तुटला आहे. या परिस्थितीमुळे वाघिवणे, इळणे आणि माळवी या गावांतील नागरिकांना दापोली, आडे, आंजर्ले आणि केळशीकडे जाणे मुश्कील झाले आहे. तसेच, लोणवडी गावातील रहिवाशांना इळणे येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि आरोग्य उपकेंद्रात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पाऊस कमी झाल्यानंतरच या पुलावरील पाणी पूर्णपणे ओसरेल. मात्र, गेले चार दिवस सुरू असलेली पावसाची संततधार थांबण्याचे नाव घेत नाहीये, त्यामुळे या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होत आहे.




























































