
संगमेश्वर तालुक्यातील गडनदी धरण पुर्ण क्षमतेने भरले आहे. गडनदी धरण क्षेत्रात ५ जुलै २०२६ रोजी पर्जन्यमापन व पाणी पातळीची नोंद करण्यात आली. धरणाची एकूण पाणी पातळी १२२.२० मीटर इतकी आहे. तर सध्या गडनदी धरणात एकूण पाणीसाठा ६६.८५१३ द.ल.घ.मीटर आणि उपयुक्त पाणीसाठा ६६.५३९३ द.ल.घ.मी.एवढा आहे. दि. ५ ते ६ जुलै २०२६ रोजी सकाळी ८.३० पर्यंत १०३.०० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत गडनदी धरण क्षेत्रात एकूण ९९४.०० मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
सांडव्यावरील विसर्ग १२६५४२ क्युसेक्स तर विमोचकातील सोडलेले पाणी ०.०० क्युसेक्स आहे. गडनदी धरण ६ जूलै २०२६ रोजी सकाळी ०७.३० वाजता भरुन वाहू लागले. त्यावेळी पाणी पातळी १२१.२० मीटर इतकी होती. तर सांडव्यावरुन १.३१५ क्यूसेक्स इतके पाणी नदीपात्रात वाहत आहे.
नदीपात्राच्या पाण्यात वाढ होताच पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. पावसाचा जोर वाढल्यास शेतकरी वर्गाने नदीपात्रात उतरु नये व स्वतः सह जनावरांची काळजी घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठा गडनदी मध्यम पाटबंधारे प्रकल्प हा येथील शेतकऱ्यांना वरदान ठरत आहे. सध्या पावसाला जोर आहे. त्यामुळे गडनदी धरण पहायला जाणाऱ्यांनी धरणात उतरु नये व सांडव्याच्या पाणीप्रवाहात शिरण्याचा प्रयत्न करु नये. नागरिकांनी आपली खबरदारी घ्यावी, असे आव्हाहन चिपळूणच्या पाटबंधारे प्रकल्प बांधकाम विभागाने केले आहे.





























































