
मुंबईसह पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची दमदार बॅटींग सुरू आहे. नद्या दुथडी भरून वाहत आहेत, झाडं पडतायत आणि दरड कोसळण्याच्या सुद्धा अनेक घटना घडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सततच्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात सद्यस्थितीत धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, पर्यटकांच्या सुरक्षिततेचा विचार करून पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध आज, 6 जुलै रोजी मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत लागू राहतील. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ही पर्यटनावर पूर्ण बंदी नसून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी उचललेले खबरदारीचे पाऊल आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, अॅम्बी व्हॅली, एकवीरा देवी मंदिर, तसेच लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग या किल्ल्यांवर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे या पर्यटनस्थळांवर अपघातांचा धोका प्रचंड वाढला आहे. त्यामुळे पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांनी आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करून नियमांची पायमल्ली करणाऱ्या हुल्लडबाजांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
पर्यटकांवर नेमके कोणते निर्बंध लादण्यात आले आहेत?
नव्या नियमांनुसार आता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना मुख्य धबधबे, ओढे, नद्या आणि धरणाच्या पाण्यात उतरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अपघात टाळण्यासाठी धोकादायक कड्यांवर जाऊन सेल्फी काढणे, व्हिडिओ शूटिंग करणे किंवा सोशल मीडियासाठी रील्स बनवण्यावर कायदेशीर मनाई असेल. यासोबतच पर्यटन परिसरात मद्यपान करणे, ध्वनीप्रदूषण करणे आणि कचरा टाकण्यास सक्त मनाई आहे. महिलांची छेड काढणारे आणि बेजबाबदारपणे वाहन चालवून इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर पोलीस कडक कारवाई करतील. तसेच धरण आणि नदीकाठच्या संवेदनशील परिसरात वाहनांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे.



























































