
करोडो फुटबॉलवेड्या चाहत्यांच्या गळ्यातला ताईत स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मोठी घोषणा करत चाहत्यांची धाकधूक वाढवली आहे. स्पेनविरुद्ध होणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘अंतिम-16’ सामन्यापूर्वी त्याने मोठी घोषणा केली आहे. कारकिर्दीत आतापर्यंत एकही वर्ल्ड कप न जिंकू शकलेल्या रोनाल्डोचा हा सहावा वर्ल्ड कप असून, यावेळचे विजेतेपद मिळवून ही उणीव भरून काढण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पोर्तुगालचा या स्पर्धेतील प्रवास पुढे सुरू राहणार की नाही, हे स्पेनविरुद्धच्या सामन्यावर अवलंबून असल्याने या लढतीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीबद्दल बोलताना रोनाल्डो म्हणाला, “मी जितका जास्त आनंद घेता येईल तितका घेत आहे. हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे, पण देवाकडे हीच प्रार्थना आहे की हा माझा शेवटचा सामना ठरू नये. असा एक दिवस नक्कीच येईल जेव्हा मी फुटबॉलमधून निवृत्त होईन. परंतु, मी पूर्ण प्रामाणिकपणे सांगतो की, उद्या मैदानात काहीही निकाल लागो, ख्रिस्तियानो रोनाल्डो शांत आणि स्वच्छ मनानेच निरोप घेईल. मी माझ्या खेळाला 100 टक्के नाही तर 1000 टक्के योगदान दिले आहे, कारण मी फुटबॉलवर मनापासून प्रेम करतो.”
रोनाल्डोने या वर्ल्ड कपमधील आपल्या कामगिरीवर आणि अनुभवावरही प्रकाश टाकला. तो पुढे म्हणाला, “माझे आयुष्य खूप चांगले आहे, पण हा सर्व पॅशनचा खेळ आहे. मी या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत 3 गोल केले आहेत, त्यामुळे मी नक्कीच वाईट खेळत नाहीये. मैदानाबाहेरील लोकांचे प्रेम आणि त्यांचा उत्साह पाहता, हा वर्ल्ड कप माझ्या आयुष्यात नेहमीच सर्वात संस्मरणीय आणि भावनिकदृष्ट्या सर्वोत्तम ठरेल.” असं रोनाल्डो म्हणाला आहे.



























































