
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पाटण गावात आज (६ जुलै) पहाटे एका घरावर दरड कोसळली असून अख्खं कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं आहे. एनडीआरएफचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलंय.
विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या पाटण गावात दुर्घटना घडली. नंदू तिकोणे असे गाडले गेलेल्या घरातील व्यक्तीचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की पहाटे 4 वाजता तिकोणेंचे घर व्यवस्थित होते. मात्र काही वेळातच मोठा आवाज झाला व मोठ्या मातीच्या ढिगाऱ्याखाली तिकोणे कुटुंबीय गाडले गेले. या घरात जवळ पास 15 जण होते असे बोलले जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पुणे येथील 5व्या बटालियनची मदत मागविण्यात आली आहे. त्यानुसार निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली 30 सदस्यांचे (1 अधिकारी, 2 वरिष्ठ अधिकारी आणि 27 जवान) पथक आवश्यक आपत्ती व्यवस्थापन साहित्यांसह सकाळी 5.50 वाजता घटनास्थळाकडे रवाना झाले. सध्या बचावकार्य सुरू असून, अधिकृतरीत्या कोणतीही जीवितहानी झाल्याची नोंद झालेली नाही.






























































