
ठाणेकरांचे फुप्फुस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बचावासाठी नागरिक रविवारी रस्त्यावर उतरले होते. या भागातील १९३ एकर जमीन वनक्षेत्र म्हणून संरक्षित करावी, जंगल वाचवावे, अशा विविध मागण्यांसाठी शेकडो नागरिकांनी मानपाडा येथील टिकुजिनीवाडी परिसरात मानवी साखळी तयार करून आंदोलन केले. या आंदोलनात पर्यावरणप्रेमी, स्थानिक नागरिक, विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जंगल वाचवा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संरक्षण करा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. वनक्षेत्र कमी होणे, जैवविविधतेला निर्माण होणारा धोका आणि भविष्यातील पर्यावरणीय परिणाम याबाबत आंदोलनकर्त्यांनी चिंता व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलावीत. अशी मागणी यावेळी करण्यात आली.






























































