
मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्यामुळे मुंबई आणि दक्षिण गुजरातच्या विविध स्थानकांवर २० हून अधिक लांब पल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. तर ४० हून अधिक गाड्या रद्द, वळवण्यात किंवा रि-शेड्युल करण्यात आल्या आहेत. आज तकने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड-विरार आणि सफाळे-पालघर या रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर सर्वाधिक परिणाम झाला आहे.
पालघरमध्ये दोन तासांत ३०० मिमी पाऊस
रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी ९ वाजेपर्यंतच्या अवघ्या दोन तासांत पालघरच्या काही भागांमध्ये तब्बल ३०० मिमी पावसाची नोंद झाली. ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. दुपारी १.५० वाजेपर्यंत विरार, वाणगाव, पालघर, डहाणू रोड आणि वलसाड यांसारख्या स्थानकांवर किमान २२ लांब पल्ल्याच्या गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. जलमय झालेले ट्रॅक आणि एका ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे १० गाड्या रद्द करण्यात आल्या असून ८ गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही गाड्या अर्ध्यातच थांबवण्यात किंवा दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या आहेत.
या पुरासारख्या परिस्थितीचा फटका अनेक गाड्यांना बसला आहे. यामध्ये वांद्रे टर्मिनस-श्री माता वैष्णोदेवी कटरा एक्सप्रेस, मुंबई सेंट्रल-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेस यांसारख्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय, अहमदाबाद, जोधपूर आणि भुजहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाड्या वापी आणि सुरत स्थानकांवरच थांबवण्यात आल्या आहेत. जेणेकरून पाण्याखाली गेलेल्या ट्रॅकवर गाड्यांची गर्दी होणार नाही.
दरम्यान, मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनलाही बसला आहे. बोरीवली आणि चर्चगेट दरम्यान लोकल गाड्या १५-२० मिनिटे उशिराने धावत आहेत. तर विरार-डहाणू मार्गावरही अनेक अडचणी येत आहेत. प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी आपल्या ट्रेनचे ताजे अपडेट्स तपासावेत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


























































