
आधी नेदरलँड्सला बाद फेरीच्या दारातून ‘खो’ दिला आणि आता सहयजमान कॅनडाच्या घरात घुसून तीन गोलांचा ‘मारा’क्को केला. आफ्रिकेचे ‘अॅटलस लायन्स’ सध्या वर्ल्ड कपमध्ये फुटबॉल खेळत नाहीत, तर प्रतिस्पर्ध्यांची शिकार करत सुटले आहेत. पहिल्या सत्रात कॅनडाने आक्रमणाचे कितीही ढोल वाजवले तरी दुसऱ्या सत्रात अझेद्दीन उनाहीने दोन तोफगोळे डागले, तर अखेरच्या क्षणी सुफियान रहिमीने तिसरा घाव घालत यजमानांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली. कॅनडाचा 3-0 असा धुव्वा उडवत मोरोक्कोने सलग दुसऱ्यांदा अंतिम आठमध्ये दणक्यात प्रवेश केला आणि जगाला पुन्हा बजावले की, कतारमधील चमत्कार हा अपघात नव्हता. मोरोक्को आता वर्ल्ड कपच्या सिंहासनावर पंजा मारायला निघालाय.
सामन्याच्या सुरुवातीला कॅनडाने आक्रमक खेळ करत वर्चस्व राखले, मात्र अनेक संधी निर्माण करूनही त्यांना गोल करता आला नाही. उलट दुसऱ्या सत्रात मोरोक्कोने आपल्या अनुभवाची आणि अचूकतेची झलक दाखवत अवघ्या काही मिनिटांत सामन्याचे चित्र पालटवले. 50 व्या मिनिटाला अचराफ हाकिमीच्या फ्री-किकवर ऊनाहीने बॉक्सच्या बाहेरून उजव्या पायाने जबरदस्त फटका मारत चेंडू थेट जाळ्यात धाडला आणि मोरोक्कोचे खाते उघडले.
कॅनडाने बरोबरीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र मोरोक्कोच्या भक्कम बचावासमोर त्यांचे सर्व डाव निष्फळ ठरले. 82 व्या मिनिटाला वेगवान प्रतिआक्रमणातून ब्राहिम डायझच्या अचूक पासवर ऊनाहीने दुसरा गोल झळकावत
कॅनडाच्या पुनरागमनाच्या आशा संपुष्टात आणल्या. भरपाई वेळेच्या अखेरच्या क्षणी दुखापतग्रस्त इस्माईल सैबारीच्या जागी मैदानात उतरलेल्या सुफियान रहिमीने तिसरा गोल करत मोरोक्कोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
कॅनडासाठी हा पराभव निराशाजनक ठरला असला तरी या विश्वचषकातील त्यांची मोहीम ऐतिहासिक ठरली. स्पर्धेतील आपल्या पहिल्याच बाद फेरीतील विजयासह त्यांनी देशातील
फुटबॉलप्रेमींना नवी आशा दिली, मात्र मोरोक्कोच्या शिस्तबद्ध आणि धारदार खेळासमोर त्यांचे आव्हान टिकले नाही. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये जोरदार शारीरिक संघर्ष पाहायला मिळाला. पंचांनी दोन्ही संघांना प्रत्येकी चार अशा एकूण आठ खेळाडूंना ‘यलो कार्ड’ दाखविले.
कॅनडाला उत्तरार्धात काही संधी मिळाल्या. जोनाथन डेव्हिडचा फ्री-किक बारच्या वरून गेला, तर ताजॉन बुपॅननचा लांब पल्ल्याचा फटका गोलरक्षक यासिन बुनूने अप्रतिम झेप घेत अडवला. कॅनडात जन्मलेल्या आणि मोरोक्कोकडून खेळणाऱ्या बुनूने तीन महत्त्वपूर्ण बचाव करत संघाचा विजय अधिक भक्कम केला.
विशेष म्हणजे, कतारमध्ये झालेल्या 2022 च्या विश्वचषकातही मोरोक्कोने गटसाखळीत
कॅनडाचा 2-1 असा पराभव केला होता. त्या स्पर्धेत मोरोक्कोने उपांत्य फेरी गाठत इतिहास रचला होता. यंदाही त्यांची विजयी घोडदौड कायम असून, विश्वविजेतेपदाच्या दिशेने त्यांनी आणखी एक भक्कम पाऊल टाकले आहे.































































