मुंबईत पावसामुळे विमान वाहतुकीवर परिणाम; १७ उड्डाणे रद्द, तर ३०० हून अधिक विमानांना विलंब

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ हवाई वाहतुकीलाही बसला आहे. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाणांवर मोठा परिणाम झाला असून, तब्बल १७ विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. एबीपी न्यूजने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पावसामुळे विमानतळावरील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केवळ १७ उड्डाणे रद्दच झाली नाहीत, तर तब्बल ३६५ विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. या विमानांना उड्डाण करण्यासाठी किंवा लँडिंगसाठी मोठा विलंब झाला आहे. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे हजारो प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

खराब हवामानामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमानतळ प्रशासन आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी काही विमानांच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.