Ratnagiri News – दापोलीत एसटी बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग; कंडक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी बसने प्रवास करणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना दापोलीत घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलिसांनी तातडीने कारवाई करत एसटी बस कंडक्टरला अटक केली असून पुंडलिक शिवाजी केंद्रे (वय 35) असे या नराधम आरोपीचे नाव आहे. शनिवार, 4 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास दापोली बस स्थानकातून सुटलेल्या दापोली-टांगर मुगीज बसमध्ये हा प्रकार घडला. शासकीय प्रवासी सेवेमध्येच सुरक्षिततेचे धिंडवडे निघाल्याने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासादरम्यान पीडित विद्यार्थिनीच्या शेजारील सीट रिकामी होताच बस कंडक्टर पुंडलिक केंद्रे तिच्या जवळ येऊन बसला. त्याने सुरुवातीला विचारपूस करत तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्यास सुरुवात केली. मुलीने विरोध करत त्याला दुसरीकडे बसण्यास सांगितले आणि ती स्वतः देखील जागा बदलून पुढे जाऊन बसली. मात्र, निर्लज्जपणाची हद्द पार करत हा वाहक पुन्हा तिच्या शेजारी गेला आणि त्याने अश्लील हेतूने तिला स्पर्श केला. या प्रसंगानंतर पीडित विद्यार्थिनीने दापोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध ‘पोक्सो’ आणि ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम 75 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.