राम मंदिरात चोरी करणारे आणि जमीन घोटाळ्यांमध्ये सामील असलेल्यांना का वाचवले जात आहे? अरविंद केजरीवालांचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामातील अनियमितता आणि देणगी चोरीच्या मुद्द्यावरून आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. “श्री राम मंदिरात चोरी करणारे आणि जमीन घोटाळ्यांमध्ये सामील असलेल्यांना का वाचवले जात आहे?” असा थेट सवाल केजरीवाल यांनी विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर भाजप नेते नितीन नवीन यांचे कौतुक करणारी एक पोस्ट केली होती. या पोस्टला उत्तर देताना केजरीवाल यांनी हा राजकीय निशाणा साधला.

काय म्हणाले केजरीवाल?

अरविंद केजरीवाल यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पंतप्रधानांच्या पोस्टचा संदर्भ देत लिहिले, “नितीन जी यांच्याबद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. पण पंतप्रधान महोदय, संपूर्ण देशाला हे जाणून घ्यायचे आहे की, श्री राम मंदिरात चोरी करणारे, जमीन घोटाळा करणारे आणि बांधकामात कमिशन खाणारे जे लोक आहेत, त्यांना का वाचवले जात आहे? त्यांना कठोर शिक्षा कधी मिळणार?”

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राम मंदिराच्या देणगीत आणि पैशांमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. या प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला असून, विरोधी पक्षांनी या संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी लावून धरली आहे.