मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या ताफ्यावर हल्ला, दोन जवान शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूर राज्यातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मणिपूरच्या उख्रुल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आसाम रायफल्सचे दोन जवान शहीद झाले आहेत. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उख्रुल जिल्ह्यातील एका दुर्गम भागात आसाम रायफल्सचे जवान गस्तीवर असताना ही घटना घडली. जवानांचा ताफा या परिसरातून जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात शस्त्रधारी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार सुरू केला. या अनपेक्षित हल्ल्याला सुरक्षा दलाच्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूंनी झालेल्या या भीषण चकमकीत आसाम रायफल्सच्या दोन जवानांना वीरमरण आले.

या भ्याड हल्ल्याची माहिती मिळताच लष्कर आणि सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. संपूर्ण परिसराला वेढा घालण्यात आला असून, जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

सध्या कोणत्याही दहशतवादी किंवा बंडखोर संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वांशिक संघर्ष आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांवर झालेला हा हल्ला अत्यंत गंभीर मानला जात आहे. या घटनेमुळे परिसरात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.