FIFA World Cup 2026 – मेस्सीच्या मुकुटावर ‘फॅरो’चा घाला, आज रात्री जगज्जेत्यांचा इजिप्तशी संघर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता फुटबॉलमध्ये ‘उद्या पाहू’ असं म्हणायला उद्याच उरलेलं नाही. राऊंड ऑफ 16 म्हणजे एक चूक, एक गोल आणि थेट विमानतळ. त्यामुळे अर्जेंटिना आणि इजिप्तची ही लढत फुटबॉलचा सामना कमी आणि जगण्यामरण्याचा संघर्ष अधिक आहे. एका बाजूला विश्वविजेत्यांचा मुकुट, दुसर्या बाजूला हजारो वर्षांच्या इतिहासातून उठलेला ‘फॅरो’. दोघांच्या मध्ये एकच फुटबॉल असून त्यावर रक्तदाब वाढवणारी नव्वद मिनिटं स्वार आहेत. रक्त कुणाचं गोठणार आणि दाब कोण निर्माण करणार ते मध्यरात्री समोर येईल.

अर्जेंटिनाने काबो व्हर्डेला 3-2 ने हरवलं खरं, पण त्या विजयाला विजय म्हणताना स्कालोनींनाही दोनदा पाणी प्यावं लागेल. अतिरिक्त वेळेपर्यंत काबो व्हर्डेने विश्वविजेत्यांना असा घाम फोडला की अर्जेंटिनाच्या जर्सीवरील तारेही क्षणभर फिके वाटले. चेंडू गमावल्यानंतर मागे परतण्याचा वेग मंदावतो, दोन सेंटर-बॅकमधली जागा उघडते आणि फुल-बॅक वर गेले की मागे महामार्ग तयार होतो. इजिप्तने नेमका हा महामार्ग पकडला, तर अर्जेंटिनाच्या मुकुटाची मिरवणूक थेट विमानतळापर्यंत जाऊ शकते.

तरीही अर्जेंटिनाकडे एक माणूस आहे, ज्याच्यासाठी फुटबॉलचे नियम वेगळे लिहिले जातात. तो म्हणजे लिओनेल मेस्सी. त्याचा डावा पाय म्हणजे शस्त्र परवान्याशिवाय फिरणारी बंदूक. एक फटका, एक पास, एक क्षण आणि सामना मृत. ज्युलियन अल्वारेझची शिकारी धाव, लाउटारो मार्टिनेझची गोलसमोरची भूक, डी पॉलचा उन्माद आणि मॅक ऑलिस्टरची बुद्धिमत्ता ही अर्जेंटिनाची युद्धसामग्री आहे.

दुसरीकडे इजिप्तसुद्धा  सहलीला आलेला नाही. ऑस्ट्रेलियाला 1-1 नंतर शूटआऊटमध्ये 4-2 ने उडवत त्यांनी दाखवलं की सामना जितका लांबेल, तितकी त्यांची नखं बाहेर येतात. मोहम्मद सालाह म्हणजे काऊंटर-अटॅकवर सुटलेली गोळी. त्याला पाच यार्ड जागा दिली, तर पुढच्या क्षणी गोलकीपर फक्त जाळं हलताना पाहतो. ओमर मार्मूशसोबत त्याची जोडी अर्जेंटिनाच्या बचावासाठी लाल इशारा आहे. इजिप्तचे सारेकाही सालाहवर अवलंबित्व, दीर्घ सामन्याचा थकवा आणि चेंडूवर कमी नियंत्रण. पण त्यांना नियंत्रण नकोच आहे; त्यांना फक्त अर्जेंटिनाची एक चूक हवी आहे.