
मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाचा धुमापूळ सुरू आहे. मागील पाच दिवसांत महिन्याभराचा पाऊस झाला आहे. कुलाबा आणि सांताक्रूझ वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्याच्या सरासरीच्या 90 टक्के जास्त पाऊस अवघ्या पाच दिवसांत झाला. आज सकाळपासून सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला. रेल्वे – रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, हवामान विभागाने उद्याही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून पालिकेने शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली.
गेल्या दोन दिवसांत शहरात 300 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 380 मिलीमीटर, पश्चिम उपनगरात 345 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोमवारच्या रेल अलर्टच्या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दुपारनंतर मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचायांना घरातून काम करण्याच्या तसेच अर्धा दिवस सुट्टीच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बहुतांश खासगी कार्यालयातील कर्मचारी अर्ध्या दिवसाने ऑफिसमधून घरी गेले. मुसळधार पावसामुळे सखल भागात कमी – अधिक प्रमाणात कुर्ला, सायन, किंग्जसर्कल, दादर, विद्याविहार, अंधेरी, विक्रोळी आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचले. त्याचा रस्ते वाहतुकीला काही प्रमाणात फटका बसला. तर मध्य रेल्वे मार्गावर विद्याविहार, कुर्ला, सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे मार्गावर काही प्रमाणात पाणी साचले होते. रेल्वे वाहतूक काहीशी उशिराने सुरू होती. त्याचा रेल्वे प्रवाशांना फटका बसला.
हवामान विभागाने मंगळवार, अति जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला आहे. तसेच, सोसाटय़ाचा वारा वाहेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे. असे आवाहन पालिकेने केले आहे.
आज उद्याने बंद
सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या अख्यारितील सर्व उद्याने मंगळवारी बंद ठेवण्यात येणार आहेत. सोसाटयाच्या वार्यामुळे झाडांच्या फांद्या तुटणे, झाडे उन्मळून पडणे, किंवा इतर अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा प्रतिबंधात्मक उपाय करण्यात आला आहे.
मुंबईत सतत कोसळत असलेल्या पावसाने मिठी नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन कुर्ला येथील क्रांतीनगरात सोमवारी पोलिसांनी उद्घोषणा करत रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
विशेष पथके तैनात
झाडे व फांद्या कोसळणे, शॉर्टसर्किट, धोकादायक इमारतींचे भाग कोसळणे तसेच इतर आपत्कालीन घटनांच्या पार्श्वभूमीवर विशेष पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. सखल भागांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा जलद निचरा करण्यासाठी उच्च क्षमतेचे उदंचन कंप, डी-वॉटरिंग यंत्रणा आणि अतिरिक्त मनुष्यबळ सातत्याने कार्यरत आहे. तसेच बचाव साहित्य, यंत्रसामग्री आणि आवश्यक संसाधने पूर्ण क्षमतेने सज्ज ठेवण्यात आली आहेत. अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली.































































