
कोकणात अवधांडो पावस् पडताहा… आडदांड, अचानक, जोरदार आणि मुसळधार पावसाने कोकणाला झोडपून काढले आहे. कशेडी घाटात दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग तब्बल 13 तास ठप्प राहिला. सध्या या घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. खेडमधील जगबुडीसह अनेक नद्यांना पूर आला आहे. बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. लांजात महामार्गावरील उड्डाणपुलाच्या सिमेंट प्लेट ढासळल्या असून वादळी वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराचे छत उडाले आहे. कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. सर्वच गाडय़ा उशिराने धावत आहेत.






























































