फडणवीसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा! – हर्षवर्धन सपकाळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत मागच्या दोन-तीन दिवसांतील दुर्घटनांमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हे मृत्यू नैसर्गिक आपत्तीमुळे नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या सुलतानी आपत्तीमुळे झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज केली.

गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर 7 हजार 181 कोटी रुपये खर्च केले. पण अवघ्या दोन महिन्यांच्या आत हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात मिसिंग लिंकच्या सुरक्षिततेबाबत तज्ञांनी 13 गंभीर आक्षेप नोंदवले होते. त्याकडे दुर्लक्ष करून घाईघाईत श्रेय लाटण्यासाठी केलेल्या कामाचे परिणाम आज दिसत आहेत, अशी टीका सपकाळ यांनी केली.

फडणवीस डिझास्टर मॅन  

‘‘मिसिंग लिंकचा फियास्को भ्रष्टाचारामुळे झाला आहे. जेवढे जास्त इंजिन लावतील, तेवढा भ्रष्टाचार वाढणार आहे. हजारो कोटी रुपयांच्या मिसिंग लिंकची दुर्दशा भ्रष्टाचारामुळे झाली आहे. देवेंद्र फडणवीस हे ‘इन्फ्रा मॅन’ नसून ‘डिझास्टर मॅन’ आहेत,’’ असा टोला त्यांनी हाणला.