FIFA World Cup 2026 – स्विस घडय़ाळ फोडायला कोलंबियन हातोडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाद फेरीत सुंदर फुटबॉलला मार्क मिळत नाहीत. इथे निकाल हवा. बाकी ताबा, पासिंग, पोझेशन, आकडेवारी सारे सामन्यानंतरच् कचरापेटीत जाते. म्हणून स्वित्झर्लंड आणि कोलंबियाची ही लढत शिस्तबद्ध फुटबॉलचा वर्ग नाही, ती दोन भिन्न स्वभावांची उघड मारामारी आहे. एका बाजूला स्विस घडय़ाळाची अचूक यंत्रणा, दुसर्या बाजूला कोलंबियन हातोडा. आता प्रश्न एवढाच आहे की घडय़ाळ वेळ सांगणार की हातोडा त्याचे काटेच उडवणार?

स्वित्झर्लंडने अल्जेरियाला 2-0 ने हरवत राऊंड ऑफ 16 गाठले. विजय स्वच्छ होता, रचना मजबूत होती आणि संदेश स्पष्ट होता की आम्ही कुणाचीही भीक मागत नाही. 20 वर्षांचा योहान मानझांबी हा या संघाचा नवा स्फोटक पदार्थ आहे. त्याच्या पायांत वेग आहे, डोक्यात धाडस आणि बॉक्समध्ये घुसण्याची निर्लज्ज भूक आहे. तो जागा मागत नाही, हिसकावतो.