FIFA World Cup 2026 – गोल झाला अन् जग एकमेकांच्या गळ्यात पडलं!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मंगेश वरवडेकर<<

फिफा वर्ल्ड कप म्हणजे फक्त 22 खेळाडू, एक फुटबॉल आणि 90 मिनिटांचा खेळ, असं ज्यांना वाटतं त्यांनी एकदा स्टेडियमच्या बाहेर फेरफटका मारावा. तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की वर्ल्ड कप हा फुटबॉलचा नव्हे तर जगाचा उत्सव आहे. तो उत्सव आता थरारक वळणावर पोहोचलाय.

यंदाच्या वर्ल्ड कपने अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तीन देशांना केवळ यजमान बनवलं नाही, तर जगाच्या बैठकीचं ठिकाण बनवलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची महासभा वर्षातून एकदा भरते, पण फुटबॉलची महासभा दर चार वर्षांतून एकदा भरते. फरक एवढाच की तिथे भाषणं होतात, इथे गाणी होतात. तिथे ठराव मंजूर होतात, इथे मैत्री मंजूर होते.

आज न्यूयॉर्कच्या रस्त्यावर चालताना डावीकडे डच चाहता दिसतो, उजवीकडे स्पेनचा. पुढच्या चौकात अर्जेंटिनाचा निळा-पांढरा झेंडा वाऱ्यावर डोलतो, तर समोर मोरोक्कोचा लाल रंग डोळे दिपवतो. एखाद्या कॅफेत ब्राझीलचा समर्थक आणि इंग्लंडचा चाहता एकाच टेबलावर बसून कॉफी पीत सामन्याची चर्चा करताना दिसतात. भाषेचा अडथळा असतो, पण फुटबॉलच्या भाषेला भाषांतर लागत नाही. खरं सांगायचं तर फुटबॉल हा जगातला एकमेव धर्म आहे, ज्यात देव वेगवेगळे असले तरी प्रार्थना एकच असते. गोल होऊ दे! गोल होई दे!

अमेरिकेची अनेक शहरं आज खरीखुरी कॉस्मोपॉलिटन झाली आहेत. तिथे फक्त माणसं नाहीत, तर संस्कृती चालतेय. एका सबवे स्टेशनवर मेक्सिकन टोपी, पुढच्या प्लॅटफॉर्मवर स्कॉटलंडचा किल्ट, तर तिसऱ्या वळणावर आफ्रिकन ढोलांचा नाद. जगाचा भूगोल जणू पायी फिरायला निघालेय, असे पावलोपावली जाणवतेय.

या वर्ल्ड कपमध्ये मला सर्वात सुंदर दृश्य दिसलं. सामना संपल्यानंतर विरोधी संघांचे चाहते एकमेकांसोबत फोटो काढताना दिसतात. मैदानावर नव्वद मिनिटे ते प्रतिस्पर्धी असतात, पण बाहेर पडल्यावर ते प्रवासी होतात. एकमेकांची जर्सी घालून, झेंडे हातात घेऊन, हसत-खेळत फोटो काढतात. युद्धात विजेता आणि पराभूत असतो, पण फुटबॉलमध्ये शेवटी आठवणी जिंकतात.

आता वर्ल्ड कप शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. तब्बल 38 संघांचे आव्हान संपलेय. जपान बाहेर गेला, जर्मनी बाहेर गेला, नेदरलँड्स बाहेर पडला, क्रोएशिया गेला, ऑस्ट्रेलियाही गेला, काल रात्री ब्राझीलही गेला, पण त्यांचे चाहते अजूनही परतलेले नाहीत. पुढील दोन आठवडे परतणारही नाहीत. कारण ते आता आपल्या संघासाठी नाही, तर फुटबॉलसाठी थांबलेत. हा फरक समजला की आपण चाहत्यापासून फुटबॉलप्रेमी होतो.

फॅन झोन हा तर या वर्ल्ड कपचा सर्वात मोठा शोध आहे. लाखो लोकांना स्टेडियमचे तिकीट मिळाले नाही, पण निराश होण्याऐवजी त्यांनी फॅन झोनमध्ये स्वतःचं विश्व निर्माण केलं. प्रचंड स्क्रीन, संगीत, ढोल, नृत्य, खाद्यपदार्थ आणि हजारो अनोळखी चेहरे. सामना सुरू झाला की एकाच गोलवर हजारो लोक एकत्र उडय़ा मारतात. कुणी कुणाला ओळखत नसतं, पण गोल झाल्यावर सारे एकमेकांच्या गळ्यात पडतात. एवढय़ा सहजपणे नाती जोडणारा दुसरा कोणता खेळ आहे? कोणताही नाही. फुटबॉल वर्ल्ड कपबाबत हे मी छातीठोकपणे सांगू शकतो.

माझ्या मते, फॅन झोन म्हणजे आधुनिक काळातील पुंभमेळा आहे. फरक एवढाच की इथे स्नान गंगेत नाही, तर फुटबॉलच्या आनंदात होतं. वर्ल्ड कप निमित्ताने अवघं विश्व एकवटलंय. सुमारे 30 ते 35 लाख परदेशी फुटबॉलप्रेमी एकटय़ा अमेरिकेत धडकले आहेत. हे आकडे फुटबॉल नंबर वन असल्याचे सिद्ध करतो.

एका ब्राझिलियन चाहत्याने चक्क आपल्या मुलीचं नाव ‘मेस्सी’ ठेवलंय, हे ऐकून एक अर्जेंटिनाचा चाहता हसत म्हणाला, ‘‘आता ती आमचीही मुलगी झाली!’’ अशा गप्पा या वर्ल्ड कपमध्ये रोज घडतात. एखादा जपानी चाहता हिंदुस्थानींना नमस्कार करतो. मेक्सिकन चाहता मराठीत ‘धन्यवाद’ म्हणतो. मोरोक्कोचा समर्थक ब्राझीलच्या चाहत्यासोबत ढोल वाजवतो. हे पाहून मी सांगतो, जगात राजकारण सीमारेषा आखतं अन् त्या सीमारेषा फुटबॉल पुसतो.

अमेरिकेच्या रस्त्यांवर फिरताना असं वाटतं की जगाने आपापले पासपोर्ट खिशात ठेवले आहेत आणि फक्त जर्सी अंगावर चढवल्या आहेत. इथे राष्ट्रवाद आहे, पण द्वेष नाही. स्पर्धा आहे, पण वैर नाही. पराभव आहे, पण कटुता नाही.

वर्ल्ड कपची खरी कमाई ट्रॉफी नाही. ती मैत्री आहे. चार वर्षांनी पुन्हा भेटू, एवढं म्हणत वेगवेगळ्या देशांतील चाहते एकमेकांचे मोबाईल नंबर घेतात, सोशल मीडियावर जोडले जातात, पुढच्या वर्ल्ड कपमध्ये  भेटण्याचं वचन देतात. फुटबॉलच्या एका गोलमुळे अनेक आयुष्यांत नवे मित्र जन्माला आले आहेत. या मित्रांचा आकडा लाखात आहे.

आपण अनेकदा म्हणतो, जग खूप लहान झालं आहे. पण ते इंटरनेटमुळे नाही. ते फुटबॉलमुळे झालं आहे. इंटरनेट माणसांना जोडतं, फुटबॉल मनं जोडतो. पृथ्वीवर देश 193 असतील, भाषा हजारो असतील, धर्म शेकडो असतील, पण आनंदाची भाषा एकच आहे. ती म्हणजे ‘गोल!’