मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पस प्रवेशद्वाराचा भाग कोसळला, तात्काळ दुरुस्ती करण्याची युवासेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस येथील हायकोर्टासमोरील प्रवेशद्वाराचा काही भाग आज दुपारी अतिवृष्टीमुळे कोसळला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेबाबत संताप व्यक्त करत युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी प्रशासनाला संपर्क करून कोणत्याही दुर्घनेची वाट न पाहता तत्काळ या प्रवेशद्वारांची दुरुस्ती करण्याची मागणी विद्यापीठाकडे केली आहे.

फोर्ट कॅम्पसमधील बँक ऑफ बडोदा समोरील प्रवेशद्वार 2 मेपासून दुरुस्तीच्या कारणामुळे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे हायकोर्टसमोरील प्रवेशद्वार सर्वांसाठी खुले करण्यात आला आहे. मात्र गेल्या चार दिवसांपासून कोसळत असलेल्या अती पर्जन्यवृष्टीमुळे प्रवेशद्वाराचा काही भागाचे दगड कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणताही विद्यार्थी, पालक, कर्मचारी किंवा पादचारी जखमी झाले नाहीत. याबाबत माहिती मिळताच युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांना फोनवरून संपर्क साधत कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता दोन्ही प्रवेशद्वाराची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी केली. दरम्यान विद्यापीठाच्या वास्तूचे कोणतेही काम पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय करता येत नसून वृक्ष छाटणी करण्यासाठी मुंबई पालिकेकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र दोन महिने उलटूनही काम सुरू झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सिनेट सदस्य पाठपुरावा करणार

दोन महिने उलटूनही काम सुरू न झाल्याने सिनेट सदस्यांनी दोन्ही प्रलंबित कामांसाठी संबंधित विभागाकडे केलेल्या पत्राची प्रत युवासेनेकडे देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. युवासेना विद्यार्थी, पालक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेसाठी तातडीने पाठपुरावा करून लवकरच पुरातत्व विभागाची परवानगी आणि वृक्ष छाटणी करून घेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करेल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.