पारशीवाडाच्या स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची चिमणी कोसळली; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना, शिवसेनेचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिमुसळधार पावसामुळे अंधेरीतील पारशीवाडा येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची चिमणी आज दुपारी अर्ध्यातून तुटून कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच शिवसेनेने घटनास्थळी धाव घेत अधिकाऱयांना फैलावर घेतले. ही नैसर्गिक आपत्ती नसून प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे घडलेली घटना असल्याचा संताप व्यक्त करत शिवसेनेने अधिकाऱयांना धारेवर धरले.

प्रभाग क्रमांक 83 मधील सहार रोड पारशीवाडा येथील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून तेथील चिमण्यांची उंची कमी असल्यामुळे त्यातून निघणारा धूर, दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे परिसरातील रहिवाशांना त्रस्त झाले आहेत. नागरिकांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ आणि आरोग्याशी संबंधित समस्या जाणवत आहेत. त्यामुळे तातडीने उपाययोजना करून पर्यावरणपूरक अवलंब करावा व त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सोनाली साबे यांनी एप्रिल महिन्यात अर्थसंकल्पात प्रखरपणे मांडली. त्यानंतर महापौर रितू तावडे यांच्यामार्फत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली होती. अधिकाऱयांसोबत अनेकवेळा पाहणी केली. मात्र अद्यापपर्यंत प्रशासनाकडून त्या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. परिणामी मुसळधार पावसाच्या तडाख्याने आज दुपारी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीची चिमणी तुटून कोसळली. याबाबत माहिती मिळताच सोनाली साबे यांनी घटनास्थळी धाव घेत अधिकाऱयांना जाब विचारला.

अत्याधुनिक पद्धतीची स्मशानभूमी उभारावी

वारंवार पाठपुरावा आणि तक्रारी करूनही प्रशासनाने केलेल्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप सोनाली साबे यांनी व्यक्त केला आहे. एखादा बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आता तरी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून अत्याधुनिक पद्धतीची स्मशानभूमी उभारावी आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी साबे यांनी केली आहे.