महाबळेश्वर वेण्णा नदीवरील पूल कोसळला; 24 तासांत 513 मी. पी. पाऊस, झाडे पडली, रस्ते खचले, गावांशी संपर्क तुटला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुसळधार पावसाने महाबळेश्वरात दाणादाण उडवली आहे. रविवारी सकाळी 8 ते सामेवारी सकाळी 8 या 24 तासांत तब्बल 513 मी. मी. (20 इंच) पावसाची नोंद झाली. पाण्याच्या प्रवाहामुळे वेण्णालेकजवळील वेण्णा नदीवरील लोखंडी पुल कोसळला. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. दरम्यान, अनेक ठिकाणी झाडे पडली, रस्ते खचले. गावांशी संपर्क तुटला असून, वीजपूरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून आज अखेरपर्यंत महाबळेश्वर परिसरात तब्बल 1717.40 मि.मी. (67 इंच) इतका आज पर्यंत पाऊस झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे महाबळेश्वर परिसरातील जनजीवन पूर्णतः कोलमडून गेले आहे. आज वेण्णा लेकजवळील री जंठाकडे जाणाऱया वेण्णा नदीवरचा लोखंडी पूल पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचला. यामुळे पुलावर उभी असलेली तीन वाहने थेट नदीपात्रात कोसळली. घटनेची माहिती मिळताच नगरपालिका प्रशासनाने तातडीने धाव घेतली आणि युद्धपातळीवर प्रयत्न करून ही वाहने नदीपात्रातून क्रेनद्वारे बाहेर काढली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. महाबळेश्वरत ठिकठिकाणी पाणी साचून तळ्याचे स्वरूप आले आहे. या जलमय रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांना शरथीचे प्रयत्न करावे लागत होते. महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावरील बगीचा कॉर्नर नजीक पाणी आल्याने वाहतूक मंदावली. त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत होती.

वीजपुरवठा खंडित

सतत पडत असलेल्या पावसामुळे संपूर्ण तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. वीज नसल्यामुळे गावागावांतील पाणी पुरवठा योजना ठप्प झाल्या आहेत. परिणामी, चहूबाजूला पाण्याचे साम्राज्य असतानाही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मोबाईल आणि इंटरनेट सुविधा पूर्णतः विस्कळीत झाली आहे. तालुक्यातील मोरणी येथे एक महाकाय वृक्ष रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. गावातील तरुण आणि स्थानिक लोक स्वतःचा जीव धोक्यात घालून, रस्ता मोकळा करण्यासाठी झाड हटवण्याचे काम करत आहेत. मात्र, अशा वेळी संवेदनशील राहण्याऐवजी वन विभाग मात्र आपला अडमुठेपणा दाखवत आहे.

ग्रामीण भागात दयनीय स्थिती

ग्रामीण भागाची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. अनेक वाडया-वस्त्यांचे रस्ते खचले असून, महाकाय झाडे कोलमडून पडली आहेत मातीचे लोट व दगडी रस्त्यावर आली असल्याने घाट रस्ते बंद झाले आहेत.घावरी-येरणे रस्ता खचल्यामुळे या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद करण्यात आली आहे. सोळशी नदीला आलेल्या पुरामुळे येरणे खुर्द, येरणे बुद्रुक, आणि आचली या गावांचा असलेला संपर्क पूर्णतः तुटला आहे. महाबळेश्वर-प्रतापगड रोडवरील हारोशी गावाच्या वरच्या बाजूला असलेल्या छोटया जन्नी माता मंदिर परिसराजवळील रस्ता घाटा च्या कडेला खचला आहे. ज्यामुळे या संपूर्ण रोडला मोठा धोका निर्माण झाला आहे.