FIFA World Cup 2026 – काल फुटबॉलही ढसाढसा रडला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> मंगेश वरवडेकर

स्कोअरबोर्ड म्हणेल की अर्जेंटिना जिंकली. स्वित्झर्लंड जिंकला. इतिहासाच्या वहीत त्याबद्दल दोन ओळी लिहिल्या जातील. आकडेवारीच्या कपाटात निकाल ठेवले जातील. पण काल रात्री फुटबॉलने जे केलं, ते स्कोअरबोर्डला कधीच समजणार नाही. कारण त्याला डोळे नसतात. ते असते तर काल त्याच्याही डोळय़ांत पाणी आलं असतं. एका बाजूला मेस्सी रडत होता. दुसऱ्या बाजूला सलाहची मान खाली होती. एका देशात लोक आनंदाने रस्त्यावर धावत होते, दुसऱ्या देशात लोक वारला शिव्या घालत होते. स्वित्झर्लंडमध्ये हृदयाचे ठोके घडय़ाळापेक्षा वेगाने धावत होते आणि कोलंबियात एका पेनल्टीने लाखो घरांत शांतता पसरवली होती. खरं सांगायचं तर एका चेंडूने चार देशांची जिंदगी फिरवली. म्हणूनच दुनिया गोल आहे. आणि फुटबॉल? तो त्याहून गोलमाल!

कालची रात्र स्वप्नवत होती. अर्जेंटिना 0-2 ने मागे होती. हा स्कोअर काळजाचे ठोके थांबवणारा होता. समोर पिरॅमिडचा देश इजिप्त. स्कोर पाहून पिरॅमिडचा देश जगज्जेत्यांसाठी कब्रस्तान खोदत होता. तेव्हा मेस्सीचा चेहरा पाहवत नव्हता. नेमार गेला, रोनाल्डो गेला. आता हा शेवटचा जादूगारही बूट हातात घेऊन बाहेर पडणार? अशी भीती फुटबॉल चाहत्यांमध्ये निर्माण झाली होती. घडय़ाळ पुढे सरकत होतं आणि प्रत्येक सेकंद मेस्सीच्या कारकीर्दीतून एक पान फाडत होतं. मग अचानक अर्जेंटिनाने एक गोल केला. 2-1. हा गोल जाळ्यात गेला नाही. तो थेट अर्जेंटिनाच्या छातीत गेला. बंद पडलेलं हृदय पुन्हा धडधडू लागलं. मग दुसरा. 2-2! आणि म्हाताऱयाने जगाला पुन्हा सांगितलं की, माझ्या निरोपाची तारीख तुम्ही ठरवू नका

काही खेळाडू 39 व्या वर्षी गुडघ्याला बर्फ लावतात. पण मेस्सी नावाचा माणूस जगाच्या काळजाला आग लावत होता. काही गोल डोळ्यांनी दिसतात, काही रिप्लेमध्ये समजतात, पण काही गोल छातीत ऐकू येतात. तो गोल तस्साच होता. मग तिसरा घाव. 3-2! बस्स. तेरा मिनिटांत अर्जेंटिनाच्या स्मशानाचं लग्नघर झालं आणि इजिप्तच्या लग्नघराचं स्मशान! पूर्ण इजिप्त मातममध्ये गेला.

अंतिम शिट्टी झाली. मेस्सीच्या डोळ्यांत पाणी आलं. ज्याने जग जिंकलं, त्याने आपल्याला आणि आपल्या देशाला वाचवलं. विक्रमांना घरचे नोकर बनवलं, तरीही तो माणूस लहान मुलासारखा भावुक झाला. कारण काही अश्रू दुःखाचे नसतात. ते वाचल्याचे असतात. नेमार गेला. रोनाल्डो गेला. आणि काही मिनिटांपूर्वी मेस्सीच्या विश्वचषक प्रवासाच्या दारावरही ‘एक्झिट’चा बोर्ड जवळजवळ लागला होता. पण त्या म्हाताऱया जादूगाराने तो बोर्ड उपटून फेकला. म्हणून त्याच्या डोळ्यांत आलेलं पाणी विजयाचं नव्हतं, ते पुनर्जन्माचं होतं.

त्याचक्षणी कॅमेरा जरा बाजूला फिरला आणि फुटबॉलची दुसरी बाजू जगाला दिसली. सलाह. मान खाली. इजिप्तचे खेळाडू गवतावर शून्य होऊन पडले होते. काही मिनिटांपूर्वी त्यांच्या हातात इतिहास होता. त्यांनी जगज्जेत्यांना पकडलं होतं. विजयाचा घास घशापर्यंत आला होता, पण अर्जेंटिनाने घशात हात घालून तो खेचून घेतला. त्यात झिकोचा रद्द झालेला गोल. पेनल्टीचे आक्रोश. वार वर संताप. रेफ्रीवर आरोप. इजिप्तच्या मनात एक प्रश्न धुमसत होता, आम्ही हरलो… की आम्हाला हरवलं गेलं?

हा प्रश्न स्कोअरबोर्डवर दिसत नाही. म्हणून स्कोअरबोर्ड कधी कधी फार मूर्ख असतो. तो फक्त 3-2 सांगतो. त्या ‘2’मागे किती अश्रू आहेत, किती तुटलेली स्वप्नं आहेत, किती संताप आहे, हे सांगत नाही. तो मेस्सीच्या डोळ्यांतलं पाणी मोजू शकत नाही आणि सलाहच्या खाली गेलेल्या मानेचं वजनही त्याला कळत नाही.

या नाटय़मय घडामोडीनंतरही त्या रात्रीची भावनिक बॅटरी संपली नव्हती. दुसऱ्या मैदानावर स्वित्झर्लंड आणि कोलंबिया पेनल्टीच्या दारात उभे होते. घडय़ाळांसाठी प्रसिद्ध असलेल्या देशात त्या क्षणी कुणी वेळ पाहत नव्हतं. लोक स्वतःची नाडी तपासत होते. एक किक. एक श्वास. एक प्रार्थना. स्विस गोल झाला की आनंदाचा स्फोट. कोलंबियाची पेनल्टी अडली की हजारो किलोमीटर दूर एखाद्या घरात बापाने डोकं धरलं असेल, मुलाने टीव्ही बंद केला असेल, आईने खेळाडूकडे पाहून म्हटलं असेल, ‘बिचारा’. कारण पेनल्टी चुकवणारा खेळाडू एकटा दिसतो. पण त्याच्यासोबत अख्खा देश चुकतो. त्या एका किकमध्ये त्याच्या पायाला फक्त चेंडू नसतो, कोटय़वधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं असतं. तो चेंडू जाळ्यात गेला तर देश नाचतो. बाहेर गेला तर एखाद्या अनोळखी घरातही जेवणाचं ताट तसंच राहतं. फुटबॉलचा हा क्रूरपणा आहे आणि सौंदर्यही.

स्वित्झर्लंड जिंकला. लाल-पांढऱ्या रंगाने आनंदात उडय़ा मारल्या. अनोळखी माणसं एकमेकांना मिठय़ा मारू लागली. कालपर्यंत ज्याने शेजाऱ्याला ‘गुड मॉर्निंग’ म्हटलं नसेल त्याने विजयाच्या आनंदात त्याचं चुंबन घेतलं असेल आणि कोलंबिया? तिथे शांतता. फुटबॉलमध्ये शांततेलाही आवाज असतो. काल तो कोलंबियात ऐकू येत होता. एखादा मुलगा आपल्या आवडत्या खेळाडूची जर्सी घालून रडला असेल. एखादा बाप त्याला समजावताना स्वतःचे डोळे चोळत असेल. कारण देश हरतो तेव्हा मोठी माणसंही अचानक लहान होतात.

एकाच रात्री अर्जेंटिनात दिवाळी होती. इजिप्तमध्ये संतापाचा ज्वालामुखी फुटला होता. स्वित्झर्लंडमध्ये आनंदाची वरात निघाली होती अन् कोलंबियात एका किकची अंत्ययात्रा. कुठे हसू फुटलं, कुठे हुंदका. कुठे अनोळखी माणसं मिठीत आली, कुठे आपल्या माणसालाही बोलावंसं वाटलं नाही. एका गोल चेंडूने चार देशांच्या भावना अशा काही फिरवल्या की पृथ्वी गोल आहे, याचा पुरावा भूगोलाच्या पुस्तकात नव्हे तर कालच्या फुटबॉलमध्ये मिळाला.

म्हणून काल कोण जिंकलं, हा प्रश्न फार छोटा आहे. एका चेंडूने एका रात्रीत चार देशांच्या छातीत वेगवेगळी हृदयं कशी बसवली? हा मोठा प्रश्न उभा राहिला होती. काल मेस्सी रडला. सलाह गप्प झाला. स्विस हसले. कोलंबिया कोसळला अन् टीव्हीसमोर बसलेला फुटबॉलप्रेमी? तो कोणाचा समर्थक आहे, हे काही क्षण विसरला. त्याचेही डोळे पाणावले होते. कारण काल अर्जेंटिना जिंकली नाही. स्वित्झर्लंडही जिंकला नाही. काल पुन्हा एकदा फुटबॉल जिंकला. म्हणूनच बहुधा … काल फुटबॉलही ढसाढसा रडला!