
डोंबिवली रुग्णालयातील डॉक्टर तसेच परिचारिकांवर शिंदे गटाच्या नगरसेवकाने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज महाडमध्येही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार धिंगाणा घातला. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावरून भाजप नगरसेवकासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रश्नावरून महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना त्यांच्या दालनात घुसून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सत्ताधाऱ्यांच्या या मुजोरीविरोधात नगर परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह शहरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान नगसेवक सूरज बामणे यांच्यासह तीनजणांवर महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे आज दुपारी १.५० च्या सुमारास नगर परिषदेच्या दालनात शासकीय कामकाज करत होते. याचवेळी त्याठिकाणी नगसेवक सूरज बामणे त्यांच्या कार्यकर्त्यांसह आले. प्रभाग क्रमांक ६ मधील पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून बामणे यांनी मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारत वाद घातला. यानंतर बामणेसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर हल्ला केला. अर्वाच्च शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या हल्ल्याने खळबळ उडाली असून भाजपच्या या गुंडगिरीविरोधात संताप व्यक्त होत आहे. आरोपींवर तातडीने कठोर कारवाई न झाल्यास कामबंद आंदोलन छेडण्याचा इशारा या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी दिला. मारहाणीनंतर तिघांना मुख्याधिकाऱ्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
नगर परिषद कर्मचाऱ्यांचे दोन दिवस कामबंद आंदोलन
मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कडकडीत निषेध नोंदवत दोन दिवस कामबंद आंदोलन पुकारले आहे.




























































