
राज्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाची धडक मोहीम अधिक तीव्र झाली असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर निर्देशानंतर अहिल्यानगर शहरातील सहा नामांकित हॉटेलांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. स्टेशन रस्त्यावरील प्रसिद्ध हॉटेल संगम आणि हॉटेल सत्कार यांच्यासह आणखी चार हॉटेलचे अन्न व्यवसाय परवाने पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आले आहेत.
या कारवाईमुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर एफडीए कोणतीही दया दाखविणार नसल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
‘एफडीए’च्या अधिकाऱयांनी अचानक केलेल्या तपासणीत संबंधित हॉटेलच्या स्वयंपाकघरात अत्यंत अस्वच्छ वातावरण, अन्न हाताळणीतील गंभीर त्रुटी, स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2011 मधील तरतुदींचा भंग आढळून आला. ग्राहकांच्या आरोग्याशी थेट तडजोड होत असल्याचे निरीक्षण नोंदविल्यानंतर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
परवाने निलंबित झाल्यानंतर संबंधित
हॉटेलना अन्न तयार करणे, विक्री करणे किंवा कोणताही खाद्य व्यवसाय चालविण्यास मनाई करण्यात आली आहे. निलंबन आदेशाचे उल्लंघन करून व्यवसाय सुरू ठेवल्यास संबंधित आस्थापना सील करणे, फौजदारी गुन्हे दाखल करणे आणि अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ‘एफडीए’ने दिला आहे.
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अस्वच्छ अन्न आस्थापनांविरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. या विशेष मोहिमेत आतापर्यंत 150हून अधिक हॉटेलची तपासणी करण्यात आली असून, 32 हून अधिक हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. अनेक आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियमांचे पालन न करणाऱयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
अहिल्यानगरातील ही कारवाई ही केवळ सुरुवात असल्याचे संकेत अधिकाऱयांनी दिले आहेत. येत्या काळात शहर व जिह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, दूध भेसळ करणारे, बेकायदा गुटखा विक्रेते तसेच अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱया सर्व आस्थापनांची व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नियमांकडे दुर्लक्ष करणाऱया व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱयांना यापुढे कोणतीही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.




























































