पंचगंगा इशारा पातळीपासून दोन फूट दूर; कोल्हापुरात संततधार, 61 बंधारे पाण्याखाली, आपत्ती व्यवस्थापन पथक तैनात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
kolhapur-rains-panchganga-river-level-nears-warning-mark-61-bunds-submerged-disaster-management-deployed

गेल्या चार-पाच दिवसांपासून संततधार कोसळणाऱया पावसाचे प्रमाण आज काही अंशी कमी झाले.दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. तर काही काळ ऊन पडल्याचे दिसून आले. या पावसामुळे सायंकाळी सहाच्या सुमारास 36 फूट 8 इंचावर पंचगंगा नदीची पातळी स्थिर होती. तरीसुद्धा 39 फुटांच्या इशारा पातळीपासून केवळ दोन फूट पंचगंगा दूर असल्याने, आपत्ती व्यवस्थापन पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले आहे. जिह्यात 61 बंधारे पाण्याखाली गेले असून, अनेक ठिकाणी पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे.

पन्हाळ्यात सर्वाधिक 58.9 मि.मी. पाऊस

कोल्हापूर जिह्यात गेल्या 24 तासांत एकूण 31.62 मि.मी. पाऊस झाला. हातकणंगले 6, शिरोळ 3.9, शाहुवाडी 29.8, राधानगरी 44.6, गगनबावडा 45.7, करवीर 25.4, कागल 17.2, गडहिंग्लज 30.1, भुदरगड 37.4, आजरा 51.2 आणि चंदगड तालुक्यात 29.3 मि.मी. पावसाची नोंद झाली.

राधानगरीत 4.60 टीएमसी पाणीसाठा

तुळशी 1.82 टीएमसी, वारणा 17.88, दूधगंगा 6.28, कासारी 1.31, कडवी 1.23, कुंभी 1.28, पाटगाव 1.66, चिकोत्रा 0.56, चित्री 0.89, जंगमहट्टी 0.70, घटप्रभा 1.56, जांबरे 0.77, आंबेआहोळ 0.88, सर्फनाला 0.55, धामणी 1.29 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

कुरुंदवाड-शिरढोण पूल पाण्याखाली

जयसिंगपूर

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाटय़ाने वाढ होत आहे.पंचगंगा नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे कुरुंदवाड–शिरढोण पुलावर पाणी आल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कुरुंदवाड ते शिरढोण मार्गे इचलकरंजीकडे जाणारा मुख्य मार्ग तातडीने वाहतुकीसाठी बंद केला आहे. या मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक अब्दुललाट – जयसिंगपूर मार्गे वळविण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.