
वय हा केवळ आकडा असतो, हे पुन्हा एकदा सिद्ध करत ३९ वर्षीय नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेच्या इतिहासातील पुरुष एकेरीतील सर्वात प्रदीर्घ उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकत अनेक विक्रम आपल्या नावे केले. ऑल इंग्लंड क्लबच्या सेंटर कोर्टवर तब्बल ५ तास १५ मिनिटे रंगलेल्या थरारक मॅरेथॉन लढतीत सर्बियाच्या या खेळाडूने स्वतःपेक्षा १४ वर्षांनी लहान असलेल्या कॅनडाच्या फेलिक्स ऑगर-अलियासिमेचा ७-६ (१०), ३-६, ६-३, ६-७ (४), ७-६ (४) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली.
५ याआधी २००८ मध्ये रेनर शुटलर आणि अर्नो क्लेमेंट यांच्यातील उपांत्यपूर्व सामना तास १२ मिनिटे चालला होता. जोकोविचने हा विक्रम तीन मिनिटांनी मागे टाकला. या सामन्यासह जोकोविचने खुल्या युगात (ओपन एरा) ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये सर्वाधिक ५० पाच सेटचे सामने खेळण्याचा विक्रमही प्रस्थापित केला. त्याने स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिंकाचा (४९) विक्रम मोडला. तसेच एका ग्रँडस्लॅममध्ये १५ वेळा पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठणारा तो तिसराच खेळाडू ठरला. यापूर्वी ही कामगिरी रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांनी केली होती.
पाच तासांच्या झुंजीनंतर सुपर टायब्रेकमध्ये निकाल
सुरुवातीपासून अखेरपर्यंत रंगलेल्या या लढतीत दोन्ही खेळाडूंनी एकमेकांना जोरदार टक्कर दिली. पाचव्या सेटपर्यंत सामना रंगला आणि अखेर सुपर टायब्रेकमध्ये त्याचा निकाल लागला. पाच तासांहून अधिक काळ चाललेल्या संघर्षानंतर दोघेही अक्षरशः थकले होते. सुपर टायब्रेकमधील २२ फटक्यांची प्रदीर्घ रॅली सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. जोकोविचने ऑगर-अलियासिमेला कोर्टच्या दोन्ही टोकांना पळवत ठेवले आणि अखेरीस कॅनेडियन खेळाडूचा फोरहँड बाहेर गेला. त्यामुळे जोकोविचने ९-४ अशी आघाडी घेतली आणि पुढच्याच गुणावर विजयावर शिक्कामोर्तब केले.
सलग आठव्यांदा उपांत्य फेरीत
या विजयासह जोकोविचने सलग आठव्यांदा विम्बल्डनची उपांत्य फेरी गाठली. या कामगिरीसह त्याने रॉजर फेडररच्या सलग सात उपांत्य फेरींच्या विक्रमालाही मागे टाकले. आता शुक्रवारी त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि गतविजेता यानिक सिनरचे आव्हान असेल. सिनरने जर्मनीच्या जान-लेनार्ड स्टूफचा ७-५, ७-६ (४), ६-३ असा पराभव करून अंतिम चारमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षीच्या विम्बल्डन उपांत्य फेरीत सिनरने जोकोविचला सरळ सेटमध्ये हरवले होते. मात्र, यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत जोकोविचने पाच सेटच्या लढतीत सिनरवर मात केली होती.
एक जोकोविच अनेक विक्रम
- ३९ वर्षे ३८ दिवसांचे असताना विम्बल्डन पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा नोव्हाक जोकोविच दुसऱ्या क्रमांकाचा ज्येष्ठ खेळाडू ठरला. हा विक्रम केन रोझवॉल (३९ वर्षे २३४ दिवस) यांच्या नावावर आहे.
- विम्बल्डनमधील त्याचा हा १०७ वा विजय ठरला. स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक विजयांचा स्वतःचाच विक्रम त्याने आणखी भक्कम केला.
- कारकिर्दीतील ही त्याची ५५वी ग्रँडस्लॅम उपांत्य फेरी ठरली. या बाबतीतही तो सर्वाधिक आघाडीवर असून, रॉजर फेडरर (४६) दुसऱ्या स्थानावर आहे.




























































