
शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सत्ताधारी भाजपवर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार निशाणा साधला आहे. कोरोना काळातील एका जुन्या प्रसंगाची आठवण करून देत दानवे यांनी ‘नियतीचा फेरा तर पहा’ त्यावेळी संपूर्ण जग ठप्प झाले होते, तेव्हा ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणाऱ्यांना आज स्वतःहून मंदिरे बंद करण्याची वेळ आली अशा शब्दांत भाजपवर बदलत्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत त्यांनी हा हल्लाबोल केला.
अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या संकटकाळात जेव्हा संपूर्ण जग ठप्प झाले होते, तेव्हा याच भाजपच्या काही लोकांनी ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी करणारी पत्रे राज्यपालांना दिली होती. राज्यपालांच्या घराचे उंबरठे झिजवून त्यांनी मंदिरे उघडण्यासाठी प्रचंड आग्रह धरला होता. मात्र, आता निसर्गाची आणि वरुणराजाची चक्री अशी काही फिरली आहे की, त्याच मंडळींवर आज स्वतःहून मंदिरे, पर्यटनस्थळे आणि गावांमध्ये लोकांना ‘नो एन्ट्री’ घोषित करण्याची वेळ आली आहे.
या बदललेल्या भूमिकेवरून आणि घेतलेल्या ‘यु-टर्न’वरून जर सत्ताधाऱ्यांवर टीका झाली, तर ती मुख्यमंत्री महोदयांना सहन होत नाही, असा टोलाही दानवे यांनी लगावला आहे.
नियतीचा फेरा तर पहा…
कोरोनाच्या काळात अख्खं जग बंद असताना, काही लोकांनी ‘मंदिरे उघडा’ अशा आशयाची पत्रं नेऊन देऊन राज्यपाल महोदयांच्या घराच्या उंबऱ्याची जाडी घासून निम्मी केली होती.
आता वरुणराजाने अशी चक्री फिरवली की, याच मंडळींना आज स्वतःहून मंदिरे, पर्यटनस्थळे आणि…
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 9, 2026
सत्ताधाऱ्यांच्या या भूमिकेचा समाचार घेताना दानवे यांनी भाजपच्याच एका खासदाराने संसदेत दिलेल्या जुन्या सल्ल्याची आठवण करून दिली. संसदेत विरोधकांना ‘सुनने की क्षमता रखीये’ असा सल्ला देणाऱ्या भाजप नेत्यांना आता स्वतःमध्ये ती क्षमता निर्माण करण्याची गरज आहे, असे दानवे म्हणाले. तसेच, मानवतेचा दृष्टिकोन आणि इतर विषयांचे धडे त्यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्यांना द्यावेत, कारण सध्या त्यांनाच त्याची सर्वात जास्त गरज आहे, असा सणसणीत टोलाही अंबादास दानवे यांनी लगावला आहे.




























































