दि. बा. पाटील नामकरणाचे आंदोलन पेटले; पोलिसांची दडपशाही, मोर्चा पनवेलमध्येच रोखला; आंदोलनकर्त्यांची धरपकड… भूमिपुत्रांचा संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्रांनी सुरू केलेले आंदोलन आज पुन्हा पेटले. महाविकास आघाडीसह भूमिपुत्रांनी मंत्रालयाच्या दिशेने काढलेला लॉंगमार्च आज पोलिसांनी पनवेलमध्येच रोखला. हे आंदोलन चिरडण्यासाठी मोर्चेकऱ्यांवर दडपशाही करत पोलिसांनी त्यांची धरपकड केली. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. महिला व पुरुष कार्यकर्त्यांना पोलिसांनी फरफटत व्हॅनमध्ये कोंबले. त्यामुळे संतापाचा आणखीनच भडका उडाला. संतप्त आंदोलकांनी जुलूमशाही करणाऱ्या भाजप महायुती सरकारविरोधात घोषणा देत पनवेल दणाणून सोडले.

तत्कालीन मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. मात्र याला जवळपास चार वर्षे होत आली तरी केंद्र सरकार नामकरणात चालढकलपणा करत आहे. यामुळे महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मंत्रालयाच्या दिशेने कूच केले. पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून हा मोर्चा विधिमंडळावर निघाला. मात्र आंदोलन सुरू होताच पनवेल शहर पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना पुढे जाण्यापासून रोखले. काही आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

शिवसेना भूमिपुत्रांच्या पाठीशी

सरकारने कितीही दंडेली करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला तरी विमानतळाच्या नामकरणासाठी शिवसेना यापुढेदेखील खंबीरपणे भूमिपुत्रांच्या पाठीशी राहील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील यांनी सांगितले. तर शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी आंदोलकांची केलेली धरपकड म्हणजे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी आहे, अशी टीका केली.

सरकारची नामांतरासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ

सरकारच्या दडपशाहीनंतर आंदोलकांनी जोरदार घोषणा देत दि. बा. पाटील यांच्या नावाच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला. या आंदोलनात खासदार सुरेश म्हात्रे, शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबन पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, रश्मिता पोपेता, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, महानगरप्रमुख अॅड. समाधान काशिद, उरणच्या नगराध्यक्षा भावना घाणेकर, माजी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे, हेमराज म्हात्रे, शहरप्रमुख प्रवीण जाधव, सदानंद शिर्के, यतीन देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते.