
प्रसूतीसाठी आणि नंतर दुर्गम भागातील माता व त्यांच्या बाळांची योग्य काळजी घेता यावी यासाठी सरकारने प्राथमिक आरोग्य केंद्राला लागूनच ‘माहेरघर’ उभारले आहे. या वास्तूमध्ये स्वयंपाकघरासह सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे मोखाडा तालुक्यातील चारपैकी तीन माहेरघरांची अवस्था बिकट झाली असून त्यांना टाळेच लागले आहेत. त्यामुळे गर्भवती मातांना आरोग्य केंद्रातच दाटीवाटीने ठेवण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.
पालघर जिल्ह्यात माता आणि बालमृत्यू टाळण्यासाठी सरकारने ‘माहेरघर’ संकल्पना राबवली होती. या मोहिमेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारातच माहेरघर ही वास्तू उभारून गर्भवतींच्या आरोग्याची काळजी घेतली जात होती. या माहेरघरात स्वयंपाकसह नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येते. पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावपाड्यांतील जोखमीच्या गर्भवती मातांना याचा फायदा होऊन त्यांचा जीव वाचतो. मात्र या माहेरघरांची दुरवस्था झाली असून ती मोडकळीस आली आहेत. चारपैकी तीन माहेरघरांची दुरवस्था झाली आहे. धक्कादायक म्हणजे इतकी भयंकर परिस्थिती असतानादेखील प्रशासन कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
वेळेत डागडुजीच केली नाही
मोखाडा तालुक्यातील बोटोशीपैकी मरकटवाडी येथील गर्भवती मातेला प्रसूतीसाठी चक्क नदीचा प्रवाह ओलांडण्यासाठी ओंडक्यावर बसवून नेण्यात आले होते. या घटनेचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माहेरघर संकल्पना राबवण्यात आली होती. मात्र या ‘माहेरघर’ ची वेळेत डागडुजी न केल्याने ते मोडकळीस आले आहे.


























































