
अमेरिका आणि इराणमधील शांतता करार मोडला असून आखातात पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी संपल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिकेने इराणच्या दक्षिण-पूर्व भागातील मोक्याच्या चाबहार बंदरावर गुरुवारी पहाटे तीव्र क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही देशांकडून सलग दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू असून यामुळे आखात पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात अमेरिका आणि इराण दरम्यान झालेल्या युद्धबंदीनंतर चाबहार बंदराला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, चाबहार शहरात गुरुवारी लागोपाठ अनेक भीषण स्फोट झाले. या हल्ल्यांनंतर शहराच्या मोठ्या भागात वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. स्फोटांचे आवाज इतके प्रचंड होते की संपूर्ण शहर हादरले. हल्ल्यानंतर स्थानिक आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिका घटनास्थळांकडे रवाना झाल्या आहेत. अमेरिकेच्या लष्कराचे मध्यपूर्व कमान असणाऱ्या सेंटकॉमने या कारवाईची पुष्टी केली आहे.
सेंटकॉमने दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेत इराणच्या सुमारे 90 लष्करी आणि सागरी तळांना अचूक लक्ष्य करण्यात आले. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये आंतरराष्ट्रीय जहाजांच्या वाहतुकीला अडथळा आणण्याची इराणची क्षमता नष्ट करण्यासाठी अमेरिकेने हे अतिरिक्त हल्ले सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांवर आणि निष्पाप कर्मचाऱ्यांवर इराणने केलेल्या बेकायदेशीर हल्ल्यांसाठी अमेरिका त्यांना जबाबदार धरत आहे.
अमेरिकेने इराणचे पीएर्स, सागरी वाहतूक नियंत्रण टॉवर आणि जवळच्या लष्करी मालमत्तांना लक्ष्य केले आहे. मात्र, नागरी बंदर सुविधा आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांना लक्ष्य करणे टाळले आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
मंगळवारी हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तीन व्यापारी जहाजांवर अज्ञात हल्ले झाले होते. या हल्ल्यांमागे इराणचा हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेने केला होता. याचा बदला म्हणून अमेरिकेने मोठी लष्करी कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संतप्त झालेल्या इराणने कुवेत आणि बहरीनमध्ये असलेल्या अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागली. या प्रतिहल्ल्यांमुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये युद्धाचे ढग गडद झाले असून शांततेचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनीही इराणच्या एका हल्ल्याला 20 हल्ले करून प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे.
हिंदुस्थानशी संबंध काय?
सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले चाबहार बंदर विकसित आणि व्यवस्थापित करण्यासाठी हिंदुस्थानने इराणशी 10 वर्षांचा करार केला. जवळपास 4200 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट आहे. मात्र इराण-अमेरिका युद्ध भडकल्याने चाबहार बंदरही हल्ल्यांपासून वाचू शकलेले नाही. चाबहार बंदराची मोठी हानी झाल्यास हिंदुस्थानलाही धक्का बसणार आहे.





























































