
जनतेच्या कराच्या पैशातून उभारलेल्या प्रकल्पांना भगदाड पडत आहेत. त्यामुळे जनता समाजमाध्यमांवर, वृत्तपत्रात, टीव्हीवर व्यक्त झाली, तर तिला ‘भाडे के टट्टू’, ‘कुत्रा’ असे म्हणून तिची चेष्टा करायची हे फक्त सुलतानाच्या राज्यात होऊ शकते. हे सुलतानाचेच राज्य असून सुलतानाच्या आजूबाजूला बसलेले निजाम फिदीफिदी हसत टाळ्या आणि बाकं वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ही सुलतानशाही असून जनतेला ‘भाडे की टट्टू’ आणि ‘कुत्रा’ म्हटल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला हवी, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. ते गुरुवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, जनतेच्या कराच्या पैशातून एक प्रकल्प निर्माण करायचा. मूळ किंमतीपेक्षा जास्त किमतीने तो प्रकल्प पूर्ण करायचा. म्हणजे जनतेच्या पैशातील 200-500 कोटी खिशात घालायचे. मग त्या प्रकल्पाचा गाजावाजा करायचा. टीव्हीचे कॅमेरे लावायचे. आमच्यासारखे कुणीच नाही असे सांगायचे. आम्ही नसतो तर हा प्रकल्प झालाच नसता अशी निवेदने करायची. जनतेला मूर्ख बनवायचे आणि त्यानंतर हा प्रकल्प जेव्हा कोसळून पडतो, जनतेच्या कराचा पैशाला अशा प्रकारे भगदाडे पडतात आणि त्यावर जनता व्यक्त झाली की तिला ‘भाडे के टट्टू’, ‘कुत्रा’ असे म्हणून त्यांची चेष्टा करायची. हे फक्त सुल्तानाच्या राज्यात होऊ शकते. हे सुलतानाचे राज्य आहे आणि सुलतानाबरोबर जे आजूबाजूला निजाम बसले आहेत ते सगळे फिदीफिदी हसत टाळ्या आणि बाकं वाजवत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातील ही सुलतानशाही आहे
म्हणे, महाराष्ट्र बदनाम करणाऱ्यांना सोडणार नाही. महाराष्ट्राच्या बदनामीचे सगळ्यात मोठे षडयंत्र जर कुणी रचले असेल तर ते अमित शहा, नरेंद्र मोदी यांनी रचले. खाण तशी माती… मोदी-शहांच्या खाली देवेंद्र फडणवीस आहेत. सत्य बोलणे महाराष्ट्राची बदनामी आहे का? असा सवाल करत संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बेफाम आरोपांवरही टीका केली. कोरोना काळापासून सर्व विषय काढून जरा ऐकून पहा. महाराष्ट्रातील आमदार-खासदार 50 कोटींना विकले आणि विकत घेतले, ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? तुम्ही आणदार-खासदार विकत घेत असताना आणि त्यांना घेऊन सरकार बनवले यात राज्याची कुठली बदनामी झाली असे वाटत नाही का? ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती, असेही संजय राऊत म्हणाले.
मालवणमध्ये भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? अशी किती उदाहरणे आम्ही तुम्हाला द्यायची. तुम्ही या राज्याची रोज बदनामी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली आहे. भगतसिंह कोश्यारी राज्यपाल होते तेव्हा त्यांनी महात्मा फुलेंपासून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जी बदनामीकारक वक्तव्य केली आणि त्याचे तुम्ही समर्थन करत होतात, ही महाराष्ट्राची बदनामी नाही का? मिस्टर फडणवीस यांना वैफल्य आले आहे. ते निराश झाले आहेत. ते गोंधळलेले आहेत, अशी टीका राऊत यांनी केली.
वैफल्य 🙄
अहंकार
माज
वैगरे वैगरे…
हे सर्व क्षणात उतरेल!
महाराष्ट्राला संस्कारी मुख्यमंत्र्याची गरज आहे!
पण काय करणार?
खाण तशी माती!
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात आणीबाणी लागू केली आहे काय?
सरकार पुरस्कृत भ्रष्टाचार,लूटमार,झुंडबाजीवर जनतेने बोलायचे नाही ही आणीबाणीच आहे! pic.twitter.com/L3ONOHOUO5— Sanjay Raut (@rautsanjay61) July 9, 2026
काल मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या जनतेला भाडे के टट्टू, कुत्रा म्हणाले. तुमच्या राज्यामध्ये रोज खून, मारामाऱ्या, बलात्कार होत आहेत, ही राज्याची बदनामी नाही का? विधानसभेत तुम्ही रोज खोटे बोलताय, ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या विधानसभा अध्यक्षांना मराठी येत नाही, ही राज्याची बदनामी आहे. विधानसभेमध्ये संविधानाच्या विरोधात जाऊन विधानसभा अध्यक्ष निकाल देतात ही राज्याची बदनामी आहे. तुमच्या भ्रष्टाचारावर जनतेने बोट ठेवले तर ती जनता ‘भाडे की टट्टू’. ही आणीबाणी उधळून लावली जाईल. नेपोलियन, अलेक्झांडर, सिकंदर सुद्धा आले आणि गेले. स्वत:ला जगज्जेता म्हणणारा कुणीही या भूमीवर टिकला नाही, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्राची जनता वाघ आहे. आज ती शांत दिसते. पण तुमच्या सारख्या चोऱ्यामाऱ्या करून सत्तेत आलेल्या लोकांनी या राज्याची सगळ्यात जास्त बदनामी केली. तुम्ही सरळ मार्गाने सत्तेवर आलेला नाहीत, ही या राज्याची बदनामी आहे. त्यामुळे जनतेला भाडे के टट्टू, कुत्रा म्हटल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेची माफी मागायला हवी. या राज्याच्या स्वाभिमानी जनतेचा इतका घोर अपमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी केला नव्हता. यालाच वैफल्य म्हणतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.




























































