
झारखंडमधील लोहार्दगा जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका खाजगी शाळेच्या मुलींच्या वसतिगृहात मध्यरात्री विषारी साप मण्यार (Krait) घुसल्याने एकच खळबळ उडाली. या सापाने खोलीत झोपलेल्या विद्यार्थीनींना दंश केला. यामध्ये एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. तर इतर तीन विद्यार्थिनींची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रोचो महुआटोली येथील ‘सानवासीरा हायर सेकेंडरी रेसिडेन्शियल स्कूल’मध्ये घडली. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनी जेवण करून वसतिगृहातील आपल्या खोलीत झोपल्या होत्या. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत विषारी मण्यार साप खोलीत घुसला.
सापाने सर्वात आधी ‘वर्षा उराव’ या 13 वर्षीय मुलीला दंश केला. सर्पदंश होताच वर्षा वेदनेने जोरात ओरडली, ज्यामुळे खोलीतील इतर मुलींना जाग आली. मात्र, काही समजण्याच्या आणि मुलींना तिथून पळ काढण्याच्या आतच संतापलेल्या सापाने जवळच झोपलेल्या अनिशा उराव, मनिषा कुमारी आणि फुलमानिया उराव या इतर तीन मुलींनाही दंश केला.
मुलींचा आरडाओरडा ऐकून वसतिगृहाचे कर्मचारी तातडीने खोलीकडे धावले. त्यांनी चारही मुलींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने उपचारादरम्यान वर्षा उराव या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. तर इतर तीन मुलींवर सध्या अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

























































