आमच्या बापाने आत्महत्या केली… तुम्ही ती चूक करू नका! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांची माउलींच्या वारीत हृदयस्पर्शी हाक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली… तुम्ही ती चूक करू नका,’ अशी काळीज पिळवटून टाकणारी आर्त साद देत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले यंदाही माउलींच्या वारीत सहभागी झाली आहेत. शेतकरी आत्महत्यांविरोधात जनजागृती करण्यासाठी काढण्यात येणाऱ्या या ‘प्रबोधन दिंडी’चे यंदाचे १५ वे वर्ष असून, आळंदी ते सासवड या टप्प्यात ही दिंडी माउलींच्या पालखीसोबत चालणार आहे.

त्र्यंबकेश्वर येथील ‘आधारतीर्थ’ आश्रमात राहणारी सुमारे ४५ मुले-मुली या दिंडीत सहभागी झाली आहेत. शेतीतील संकट, कर्जबाजारीपणा आणि नैराश्य यामुळे आपल्या वडिलांना गमावलेल्या या मुलांनी स्वतःचे दुःख बाजूला ठेवत इतर शेतकरी कुटुंबांवर अशी वेळ येऊ नये, यासाठी जनजागृतीचा वसा घेतला आहे. ‘आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा पर्याय नाही’, ‘शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका’, ‘आमचा बाप शेतकरी’ अशा संदेशांचे फलक हातात घेऊन ही मुले वारकऱ्यांशी संवाद साधत आहेत. त्यांचा संदेश आणि डोळ्यांतील वेदना वारकऱ्यांना अंतर्मुख करत आहेत.

काही वारकरी या मुलांचे सांत्वन करताना त्यांचे कौतुकही करत आहेत. पालकांच्या आत्महत्येनंतर पोरकेपणाचे दुःख भोगणारी ही मुले इतर शेतकऱ्यांच्या लेकरांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी वारीच्या माध्यमातून समाजाला जागवत आहेत. ‘आमच्यावर जी वेळ आली, ती दुसऱ्या कोणत्याही मुलावर येऊ नये!’ हा त्यांचा संदेश प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करत आहे. १५ वर्षांपासून सुरू असलेली ही ‘प्रबोधन दिंडी’ वारीतील सामाजिक बांधिलकीचे वेगळे उदाहरण ठरत आहे.