INDW vs ENGW Test – इंग्लंडमध्ये हिंदुस्थानला दमदार आघाडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या क्रांती गौडने इंग्लंडचा अर्धा संघ गारद केला आणि संघाला एकमेव कसोटी सामन्यात शतकी आघाडी मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. हिंदुस्थानचा पहिला डाव 285 धावांवर संपला होता. या धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा पहिला डाव शनिवारी 170 धावांत सर्वबाद झाला आणि हिंदुस्थानला तब्बल 115 धावांची आघाडी मिळाली. दिवस अखेर हिंदुस्थानची 1 बाद 154 अशी स्थिती असून, स्मृती मानधनाने नाबाद 69 धावांची खेळी केली. हिंदुस्थानकडे आता एकूण 269 धावांची आघाडी आहे.

शनिवारी 1 बाद 21वरून इंग्लंडने आजच्या दिवसाची सुरुवात केली. क्रांतीने अचूक आणि भेदक मारा करत इंग्लंडच्या फलंदाजांना पळता भुई थोडी करून सोडले. क्रांतीने इंग्लंडची कर्णधार नॅट सिव्हर ब्रंटसह (44) चार खेळाडूंना बाद करत हिंदुस्थानसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. क्रांतीला सायली सातघरे आणि स्नेह राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स मिळवत सुयोग्य साथ दिली.