
कंपनीच्या कार्यक्षेत्रातील अंजनवेल, रानवी व वेलदूर या ग्रामपंचायतींचा गेल्या दोन-अडीच वर्षांचा सुमारे साडेचार कोटींचा कर थकविल्याप्रकरणी रत्नागिरी गॅस अॅण्ड पॉवर प्रा. लि. प्रकल्पावर (आरजीपीपीएल) 28 जुलै रोजी जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती सरपंच सोनल मोरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. कर थकविल्यामुळे संपूर्ण गावाच्या विकासाला खीळ बसल्याचा आरोपही त्यांनी केला.
अंजनवेल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत तीनही गावांचे सरपंच, सदस्य व काही ग्रामस्थ उपस्थित होते. प्रारंभी माजी सरपंच यशवंत बाईत यांनी याबद्दलची पार्श्वभूमी सांगितली. वर्ष 2020 ते 2021 पर्यंत सुमारे 16 वर्षे कंपनीने नियमितपणे ग्रामपंचायतीला जमीन व इमारत कर दिला. मात्र सन 2021-2022 पासून जमीन व इमारत कर देण्यास नकार दिला होता.
28 जुलैला जप्तीची कारवाई
कंपनीकडून कर वसूल करण्यासाठी कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याचे तीनही ग्रामपंचायतींच्या मासिक सभेत व ग्रामसभेत ठराव करून 28 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता पंपनीवर जप्तीची कारवाई सुरू करण्याचे ठरविण्यात आले असल्याचे सरपंच सोनल मोरे यांनी सांगितले. कारवाईबाबत सीईओ, रत्नागिरी गॅस आणि पॉवर प्रा. लि., जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गुहागर गटविकास अधिकारी व गुहागरचे पोलीस निरीक्षक यांनाही लेखी पत्राने कळविले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.


























































