
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर गेले आहेत. तिथे न्यूझीलंड व हिंदुस्थानमध्ये काही सामंजस्य करार होणार आहेत. दरम्यान या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडमध्ये शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेत देखील एका पत्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाही? असा सवाल केला. याआधी नॉर्वेमध्येही एका पत्रकाराने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना हा सवाल केला होता.
मोदींच्या न्यूझीलंड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना “पंतप्रधान मोदींनी येथील पत्रकारांसाठी पत्रकार परिषद का घेतली नाही?” असा प्रश्न विचारला. यावेळी उत्तर देताना टंडन यांनी हसत हसत, “हा प्रश्न ऐकून मला पंतप्रधान मोदींच्या नॉर्वे दौऱ्यादरम्यान घडलेल्या अशाच एका घटनेची आठवण झाली. हिंदुस्थानातील बहुतांश मतदार ग्रामीण भागातील असून, त्यांना एखाद्या मध्यस्थीच्या माध्यमातून संवाद साधण्याऐवजी थेट संपर्क आवडतो. पंतप्रधान मोदींना मतदारांशी थेट संवाद साधतात. ते हे काम चांगल्या प्रकारे करतात, म्हणूनच पुन्हा निवडून आले आणि तिसरा कार्यकाळ सुरु आहे. ते सर्वाधिक काळ राहिलेले पंतप्रधान ठरले आहेत”, असे टंडन म्हणाले.



























































