आपला आणि हिंदुस्थानचा DNA एकच आहे; अफगाणिस्तानच्या मंत्र्याच्या वक्तव्याने पाकड्यांचा तिळपापड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तानसोबत सतत बिघडत असलेले संबंध आणि वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानने हिंदुस्थानसोबतचे आपले संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हिंदुस्थान दौऱ्यावर असलेले अफगाणिस्तानचे कृषी, सिंचन आणि पशुसंवर्धन मंत्री, मौलवी अत्ताउल्लाह ओमारी यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांचे अनेक उदाहणे देत हिंदुस्थानचे कौतुक केले. तसेच ते म्हणाले, हिंदुस्थान आणि अफगाणिस्तानचा DNA एकच आहे. हिंदुस्थानात आल्यावर आपल्याच देशात आणि आपल्याच लोकांमध्ये असल्यासारखे मला वाटते, असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे.

पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचे कृषी मंत्री, मौलवी अताउल्लाह ओमारी यांनी प्रथमच हिंदुस्थानला भेट दिली. त्यांनी हिंदुस्थानसोबतच्या संबंधांची प्रशंसा केली आणि म्हटले की दोन्ही देशांचा डीएनए एकच आहे आणि हिंदुस्थान त्यांना स्वतःच्या देशासारखा वाटतो.

नवी दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) सहकार्याने आयोजित हिंदुस्थान-अफगाणिस्तान व्यापार, उद्योग संवादात्मक सत्राला संबोधित करताना ओमारी म्हणाले की, हा त्यांचा पहिलाच हिंदुस्थान दौरा असून, तिथे मिळालेल्या आदराने आणि आपुलकीने त्यांचे मन जिंकले.

इथे आल्याच्या पहिल्या दिवसापासून केंद्र सरकार, परराष्ट्र मंत्रालय आणि भेटलेल्या प्रत्येकाने माझे हार्दिक स्वागत केले. मला असे वाटले की मी माझ्याच देशात आहे. आमचे संबंध केवळ राजनैतिक नाहीत, तर ते सामायिक इतिहास, संस्कृती आणि सभ्यतेबद्दल आहेत. आमचे डीएनए समान आहेत. अफगाण मंत्र्यांनी हिंदुस्थानच्या पाहुणचाराचे कौतुक केले.

हिंदुस्थानच्या पाहुणचाराने अफगाणिस्तानच्या लोकांसाठी आशेचा नवा किरण आणला आहे. हा सन्मान अफगाणिस्तानच्या लोकांसाठी एका चांगल्या भविष्याची आशा आहे. आपला समाज जवळपास ८० टक्के शेती, सिंचन आणि पशुपालनावर अवलंबून आहे. आता या क्षेत्रांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याची वेळ आली आहे आणि या दिशेने हिंदुस्थान एक महत्त्वाचा भागीदार होऊ शकतो. आर्थिक विकासासाठी अफगाणिस्तानला जगभरातील विविध देशांसोबत सहकार्य वाढवायचे आहे. त्यांनी गुंतवणूक, कृषी तंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया, सिंचन आणि क्षमता बांधणी या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी भारतीय उद्योगांना आवाहनही केले.

अफगाण मंत्र्यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा सीमा विवाद, सुरक्षा समस्या आणि राजकीय मतभेदांवरून अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. अशा वातावरणात, अफगाणिस्तानची हिंदुस्थानसोबतची वाढती जवळीक प्रादेशिक राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दोन्ही देशांत निर्माण होत असलेल्या चांगल्या संबंधांमुळे पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या आहेत.