मुख्य जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी रस्त्यावर, शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवली पूर्वेतील व्ही. पी. रोड परिसरात गेल्या १५ ते २० दिवसांपासून मुख्य जलवाहिनी फुटलेली आहे. त्यातून दररोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. शहरात पाणीटंचाईचे चालू असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या पाण्याच्या अपव्ययाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने केला आहे. तातडीने जलवाहिनी दुरुस्ती न केल्यास शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

यासंदर्भात पेंडसेनगर शाखाप्रमुख हेमंत गिमावकर आणि युवा शाखा अधिकारी अनुज मोरे यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या. मात्र, महापालिका प्रशासन ही जबाबदारी एमएमआरडीएकडे ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे एमएमआरडीएकडे संपर्क साधल्यानंतर दोन ते तीन दिवसांत दुरुस्ती करू, असे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.

तत्काळ दुरुस्ती करा !

पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर महापालिका वारंवार शटडाऊन घेते, मात्र फुटलेल्या जलवाहिनीची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी वेळ नसल्याचे चित्र दिसत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून महापालिका आणि एमएमआरडीएने तातडीने लक्ष घालून गळतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शाखाप्रमुख हेमंत गिमावकर यांनी दिला आहे.