
रायगड जिल्ह्यातील बंदरांवर ‘तिसरा डोळा’ ठेवण्यात आला आहे. पोलीस खात्याने लाखो रुपये खर्च करून दीडशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्यामुळे बंदर परिसरातील बारीक घडामोडींवर आता चोवीस तास लक्ष ठेवले जाणार आहे. रायगडातील बंदरमार्गे कुणी घुसखोरी केली तर तातडीने मुख्य नियंत्रण कक्षाला समजेल. त्यानंतर घटनास्थळी लगेच सागरी पोलिसांचे पथक धाव घेणार आहे. बंदरांच्या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे अत्याधुनिक असून त्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकदेखील स्थापन केले आहे.
रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांची सुरक्षा अतिशय महत्त्वाची समजली जाते. १९९३ च्या मुंबईतील बॉम्बस्फोटाच्या वेळी रोखाडी बंदरातून मोठ्या प्रमाणावर स्फोटके आली होती. त्यानंतर येथील सुरक्षेत वाढ करण्यात आली. रायगडचे सर्व किनारे व बंदरे आता सुरक्षेच्या रडारवर आली असून अलिबाग, वरसोली समुद्रकिनारे, रेवस, मांडवा, जंगल, धरमतर, बांगमांडला, दिघी प्रवासी, पीएनपी, सानेगाव, जेएसडब्ल्यू, राजपुरी जेट्टी, दिघी पोर्ट येथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सानेगाव जेट्टीच्या ठिकाणी १६, दिघी पोर्ट येथे २१, धरमतर पोर्टच्या ठिकाणी ५१, मांडवा जेट्टी येथे २४ कॅमेरे लावले आहेत.
पर्यटकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य रायगड जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत आहे. वेगवेगळे प्रकल्प येथे उभे असताना आणखी काही प्रकल्प नव्याने निर्माण होत आहेत. गेलसह आरसीएफच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पाचे काम जिल्ह्यात सुरू आहे. जिल्ह्यात औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने रोजगारासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यातून, राज्यातून कामगार दाखल झाले आहेत. औद्योगिकीकरणाबरोबरच पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्याला प्रचंड महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेलादेखील प्राधान्य देण्यात आले आहे.
- अलिबाग, वरसोली, मांडवा, नागाव, आक्षी, किहीम, मुरुड, काशीद, रेवदंडा, बोर्ली, दिवेआगर, श्रीवर्धन अशा अनेक समुद्रकिनारी दहा लाखांहून अधिक पर्यटक वर्षाला भेटी देतात.
- दिवाळी, उन्हाळी सुट्टीबरोबरच शनिवार आणि रविवारी साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात. वेगवेगळ्या समुद्रकिनारी फिरण्याचा आनंद पर्यटक लुटतात.
- गेट वे ते मांडवा, भाऊचा धक्का ते मांडवा या सागरी मार्गाने बहुतांश पर्यटक येतात. जिल्ह्यातील पर्यटकांसह नागरिकांच्या सुरक्षेसाठी रायगड पोलिसांनी आता कंबर कसली आहे.



























































