ट्रम्प यांना कळलं रघुरामाचं महत्त्व! अमेरिकेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने वेगाने बदलणाऱ्या अर्थव्यवस्थेत कशा प्रकारे कार्य करावे, याची दिशा ठरण्यासाठी अर्थशास्त्र, व्यवसाय आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील काही दिग्गज व्यक्तींची मदत घेण्याचे ठरवले आहे. यामध्ये आरबीआयचे माजी गव्हर्नर आणि अर्थतज्ञ रघुराम राजन, राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या अधिकारी आशा शर्मा यांची तीन समित्यांचे नेतृत्व करण्यासाठी निवड केली आहे.

‘फेड’चे प्रमुख केविन वॉर्श यांनी पाच स्वतंत्र टास्क फोर्सेस सदस्यांची घोषणा केली. हे टास्क फोर्स फेडरल रिझर्व्हच्या कामकाजातील महत्त्वाच्या पैलूंचा आढावा घेतील. यामध्ये महागाई आणि संवाद यंत्रणापासून ते कृत्रिम बुद्धिमत्ता, उत्पादकता आणि ट्रिलियन्स डॉलर्सच्या ‘बॅलन्स शीट’चे व्यवस्थापन यांसारख्या बाबींचा समावेश असेल. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष केविन वॉर्श यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत या उपक्रमाची घोषणा केली होती. महागाई आटोक्यात ठेवणे आणि जास्तीत जास्त रोजगार निश्चित करण्याबाबत फेडरल रिझर्व्हची कटिबद्धता अढळ आहे. ‘फेड’च्या प्रत्येक टास्क फोर्सचे नेतृत्व शैक्षणिक क्षेत्र, उद्योगजगत आणि मध्यवर्ती बँकिंग क्षेत्रातील तज्ञांमार्फत संयुक्तपणे केले जाईल. हे टास्क पर्ह्स स्वतंत्रपणे काम करतील. ‘फेडरल ओपन मार्केट कमिटी’ला पुराव्यांवर आधारित शिफारसी सादर करतील. ही आढावा प्रक्रिया या वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल, अशी अपेक्षा वॉर्श यांनी व्यक्त केली आहे.

रघुराम राजन ताळेबंद धोरणावर काम करणार

रघुराम राजन हे हार्वर्डच्या अर्थशास्त्रज्ञ कॅरेन डायनन आणि फेडरल रिझर्व्हचे माजी गव्हर्नर जेरेमी स्टीन यांच्यासोबत ताळेबंद धोरणावर काम करतील. हे पॅनेल फेडरल रिझर्व्हच्या सध्याच्या ताळेबंद व्यवस्थेचे खर्च, फायदे आणि परिणाम तपासतील, ज्यामध्ये त्यांची मालमत्ता आणि चलनविषयक धोरणाच्या अंमलबजावणीतील त्यांची भूमिका यांचा समावेश आहे. राजन हे सध्या शिकागो विद्यापीठाच्या बूथ स्पूल ऑफ बिझनेसमध्ये वित्त विषयाचे प्राध्यापक आहेत.