
ठाणे जिल्ह्यातील दाभाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आदिवासी महिला व नवजात बालकाच्या मृत्यूप्रकरणी 15 दिवसांत आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करणार, अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधान परिषदेत दिली. आमदार चित्रा वाघ यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री आबिटकर म्हणाले, मेंदे बीजपाडा या आदिवासी पाड्यातील सविता विनोद रावते यांच्या मृत्यू प्रकरणात आशासेविकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ), वरिष्ठ अधिकारी किंवा अन्य दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. केवळ चौकशी समिती स्थापन करून प्रकरण प्रलंबित ठेवले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
























































