महाराष्ट्रातील 175 तरुण पाकिस्तानी गँगस्टर शाजाद भट्टीच्या संपर्कात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पाकिस्तान आणि दुबईतून हिंदुस्थानच्या विरोधात कारवाया करणाऱया शाजाद भट्टी या कुख्यात गँगस्टर आणि आयएसआयच्या हस्तकाच्या संशयास्पद जाळ्याचा पर्दाफाश केला आहे. राज्यभरातील तब्बल 175 संशयित तरुण भट्टीच्या संपर्कात आल्याचे उघड झाल्यानंतर, एटीएसने आज सकाळी 7 वाजल्यापासून एकाच वेळी धडक शोधमोहीम सुरू केली. या कारवाईमुळे देशविरोधी शक्तींचे मोठे डिजिटल जाळे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या देशव्यापी कारवाईत एकटय़ा पूर्व विदर्भातून 10 संशयित तरुण एटीएसच्या रडारवर आले आहेत. यामध्ये नागपूर शहरातून 4, चंद्रपूरमधून 3, तर गोंदिया, गडचिरोली आणि वर्ध्यातून प्रत्येकी 1 संशयित तरुणाचा समावेश आहे. एटीएसच्या विशेष तुकडय़ांनी या सर्व ठिकाणी एकाच वेळी छापे टापून संबंधित तरुणांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. पूर्व विदर्भात शाजाद भट्टीशी संबंधित कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच एटीएसने चंद्रपूर आणि भंडारा जिह्यात अशाच प्रकारची गुप्त कारवाई केली होती. तेव्हापासूनच संशयित हालचालींवर बारीक नजर ठेवली जात होती.

या ताज्या कारवाईत एटीएस प्रामुख्याने एका वेगळ्या अंगाने तपास करत आहे. हे संशयित तरुण शाजाद भट्टीच्या थेट संपका&त कसे आले, त्यांनी भट्टीने तयार केलेल्या चिथावणीखोर रील्स सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या का किंवा त्याला फक्त ‘लाईक’ केले होते का, याचा तांत्रिक तपास केला जात आहे.

कर्जत-खालापुरातून तीन संशयितांना एटीएसने उचलले

दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणारा आयएसआयचा दहशतवादी शाहजाद भट्टी याच्या हस्तकांच्या संपर्कात असलेल्या तीन संशयितांना आज एटीएसने कर्जत, खालापुरातून उचलले. हे सर्वजण तरुणांची माथी भडकवून त्यांना स्लीपर सेल बनवण्याचे काम करत होते असा संशय आहे. शाजाद भट्टी हा मूळचा पाकिस्तानी गँगस्टर असून, तो सध्या दुबईतून आयएसआयच्या इशाऱयावर फुट सोल्जर मिशन चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. हिंदुस्थानातील तरुण पिढीला लक्ष्य करून, सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भडकावणे, देशात स्लीपर सेल्स तयार करणे आणि मोठय़ा शहरांमध्ये घातपात घडवून आणणे हा त्याचा मुख्य हेतू आहे.