
सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान स्वतःचीच बाजू मांडणाऱया वकिलाने गोंधळ घातला. सरन्यायाधीश सूर्य कांत यांना शिवीगाळ केली, तसेच कागदपत्रांची फाइलदेखील फेकली. या घटनेमुळे न्यायालयात खळबळ उडाली. सुरक्षा रक्षकांनी या वकिलाला तत्काळ न्यायालयाबाहेर काढले.
प्रबल प्रताप असे या वकिलाचे नाव आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने त्याची रिट याचिका फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्या. के. व्ही. विश्वनाथन आणि न्या. आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणी सुरू होताच वकिलाने थेट न्यायाधीशांनाच आदेश दिला. ‘न्यायिक अधिकारी महोदय, मी तुम्हाला आदेश देतो, की लखनौच्या अतिरिक्त पोलीस आयुक्तांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्यावे’, असे प्रबलने म्हणताच न्यायालयात उपस्थितांना धक्काच बसला. स्वतः न्या. विश्वनाथ म्हणाले, तुम्ही मला आदेश देत आहात? आम्हाला आदेश देत आहात? त्यावर प्रबल प्रताप म्हणाला, की माझ्याकडून एवढेच. सर्व काही रेकॉर्डवर आहे. त्यानंतर त्याने खटल्याशी संबंधित फाइल हवेत फेकली आणि शिवीगाळ सुरू केली.
न्यायालयाची नरमाई, कारवाई नाही
या घटनेनंतर सर्वोच्च न्यायालयाने नरमाईची भूमिका घेतली. न्या. विश्वनाथ म्हणाले की, तो हताश आणि त्रस्त झालेला दिसतो. त्याच्याबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. आम्ही त्याच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही. खटल्याचा विचार केल्यास, उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्याचे आम्हाला ठोस कारण सापडले नाही. त्यामुळे याचिका आम्ही फेटाळत आहोत.





























































