सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, सरकारने त्यांचा अवमान तरी करू नये, सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sudhir mungantiwar

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याचा प्रस्ताव सरकारने न आणल्याने भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत उघड नाराजी व्यक्त केली. सावरकरांना इंग्रजांनी यातना दिल्या, सरकारने त्यांचा अवमान तरी करू नये अशा शब्दांत सरकारला घरचा आहेर देताना, यानंतर आपण पुन्हा सभागृहात हा मुद्दा कानाही अशी प्रतिज्ञा घेतो, अशा तीव्र भावना त्यांनी व्यक्त केल्या.

सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याबाबत मागील अधिवेशनात मांडलेल्या अशासकीय ठरावाची आठवण आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना करून दिली. यावेळी त्यांनी मंत्र्यांनाही खडे बोल सुनावले. आपल्या ठरावानुसार केंद्र सरकारकडे शिफारस करू, असे मंत्री जयकुमार रावल यांनी मागच्या अधिवेशनात म्हटले होते. मात्र कामकाज पत्रिकेत याबाबतचा कोणताही उल्लेख नाही, असा संताप मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

सरकार आल्यानंतर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव मांडण्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. सत्ता आल्यानंतर त्याचा सरकारला विसर पडावा हे योग्य नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याबाबतच्या प्रस्तावाच्या फाइलला इतकी का यातना होत आहे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला. ज्या पक्षाचा कार्यकर्ता सावरकरांच्या विचारांवर जगला, तेच सरकार फाईल दाबून ठेवत असेल तर योग्य नाही असे ते म्हणाले.

अधिवेशनात ठराव आणू

कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या ठरावाबद्दल चर्चा करायचे राहून गेले म्हणून कामकाज पत्रिकेत तो ठराव येऊ शकलेला नाही. ती आपली चूक असून सरकारने तो निर्णय घेतलेला नाही. सावरकरांना भारतरत्न देण्याचा ठराव चर्चेतून यावा. अधिवेशनात तो आणला जाईल, असे आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.